Movie Review : नदी सारखी नात्यांची खळखळ वाहणारी गोष्ट ‘गोदावरी’

By  
on  

सिनेमा - गोदावरी
पटकथा -संवाद -  निखिल महाजन, प्राजक्त देशमुख 

दिग्दर्शन – निखिल महाजन
कलाकार -  जितेंद्र जोशी, नीना कुलकर्णी, विक्रम गोखले, संजय मोने, गौरी नलावडे, प्रियदर्शन जाधव, मोहित टाकळकर, सखी गोखले, सिध्दार्थ मेनन,

 

पिढ्यान पिढ्या अनेक कुटुंब आपला पारंपारिक वारसा जपतात. जे काही काम असेल, व्यवसाय असेल ते इमाने-इतबारे करतात आणि संसाराचा गाडा रेटतात. वर्षानुवर्ष हे चक्र सुरु असतं. त्यात नाविन्य असं काहीच नसतं. फक्त एका पिढीकडून दुस-या पिढीकडे ते पुढे सरकत रहातं.  पण हे चक्र झुगारुन द्यायचं असेल  आणि नवं काही करु पाहायची इच्छा असेल तर मात्र संपूर्ण कुटुंबाचा रोष पत्करावा लागतो.  मग कुटुंबात याचे पडसाद उमटू लागतात. कारण पिढ्यांप्रमाणेच विचारांची दरी ही असतेच. अशीच नदीकाठी वसलेल्या एका कुटुंबाची गोष्ट अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळतेय, ती ‘गोदावरी’च्या निमित्ताने.


 

नदीसारखी मानवी नातेसंबधांची खळखळ वाहणारी ही गोष्ट मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मराठीसोबतच हिंदीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा जिंतेंद्र जोशी याने या सिनेमात अभिनेता, निर्माता आणि गीतकार अशा तिहेरी भूमिका लिलया पार पाडल्या आहेत. नाशिकच्या गोदावरीकाठी अनेक वर्षांपासून वसलेल्या देशपांडे कुटुंबाची ही गोष्ट आहे. नाशिकच्या गोदावरी नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. त्यामुळे नदीकाठी घाटावर  वसलेल्या अनेक घरांत, दुकानात पुराचं पाणी शिरतं आणि आर्थिक हानीसोबत कधीकधी निसर्गाच्या रौद्रावतारामुळे मनुष्यहानीसुध्दा होते. याच नदीभोवती सिनेमात नात्यांची सुरेख गुंफण केलेली पाहायला मिळतेय. 

नदीकाठी पारंपारिक वाड्यात राहणारा निशिकांत देशमुख ( जितेंद्र जोशी) हा मनाविरुध्द अनेक वर्ष वडिलोपार्जित सुरु असलेला व्यवसाय सांभाळतो. नदीकाठची अनेक जुनी दुकाने , घरे ही देशमुख कुटुंबाच्या मालकीची असतात. त्या दुकानदारांकडून, घऱात राहणा-या भाडेकरुंकडून भाडे वसूल करणं हे काम तो अनेक वर्ष करत असतो. नव्या पिढीतल्या निशिकांतला मात्र हे पारंपारिक काम नकोसं वाटतं, या चक्रात त्याला अडकायचं नसतं.पण घरच्यांच्या दबावापोटी तो हे करतो असं त्याचं म्हणणं असतं. म्हणूनच तो विवाहित असूनही मतभेदांमुळे आई-वडील, आजोबा, पत्नी –मुलगी म्हणजेच संपूर्ण कुटुंबापासून वेगळा थोडं दूरवर एका खोलीत रहात असतो. अधनं-मधनं जेव्हा तो घरी येतो तेव्हा फक्त आणि फक्त वादच उद्भवतात. वडिलांसोबतचा अबोला, आई सोबतचे होणारे सततचे वाद, मनाविरुध्द कराव्या लागणा-या गोष्टींमुळे झालेला चिडचिडा स्वभाव आणि तरीही पत्नी-मुलीसाठी असलेलं निशीचं संवेदनशील मन सिनेमा पाहताना सतत जाणवतं. अचानक एकदा निशिच्या आयुष्याला कलाटणी देणारी एक घटना घडते आणि त्यानंतर त्याचा जगण्याकडे पाहण्याचा संपूर्ण दृष्टीकोनच बदलतो. ज्या गोष्टींकडे आत्तापर्यंत निशि ज्या तुच्छतेने पाहत असतो, त्याच गोष्टींचा तो नव्याने आदर करायला शिकतो. त्याच्या स्वभावात आपसूकच हळूवार बदल होऊ लागतात. नास्तिकतेकडून त्याचा आस्तिकतेकडे एक सुंदर प्रवास सिनेमाच्या उत्तर्धात सुरु होतो. 

दिग्दर्शकाने नाशिकच आणि गोदावरीचं एक सुंदर असं चित्र संपूर्ण सिनेमाभर रेखाटलं आहे. ही एक व्हिज्युएल ट्रीटच ठरते. प्रत्येक प्रसंगानुरुप कॅमे-याची एक अप्रतिम फ्रेम प्रेक्षक अनुभवतो. सिनेमॅटोग्राफी, कथा, संवाद,दिग्दर्शन, अभिनय आणि कलाकार या सर्वच बाबतीत सिनेमा उजवा ठरतोय. जितेंद्र जोशीसोबतच विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, संजय मोने, प्रियदर्शन जाधव, गौरी नलावडे यांच्या दर्जेदार अभिनयाने हा सिनेमा नटलाय. विक्रम गोखलेंनी साकारलेल्या आबांना तोड नाही. तर मोहित टाकळकरने साकारलेला फुगेवाला कायम लक्षात राहतो. तर कासव म्हणजे अभिनेता प्रियदर्शनचा संवाद “चार वर्षांचा होतो तेव्हापासून ह्या घाटावरच्या पिंडांवरचा भात खाऊन जगलोय...”,  हा संवादातलं वाक्य काळजाला भिडतं. तर निळकंठ देशमुख ही व्यक्तिरेखा साकारणारे संजय मोनेंचा जितेंद्र जोशींसोबतच्या संवादातलं वाक्य“ आपल्या धमन्यांमध्ये रक्त नाही तर ही गोदावरी नदी वाहतेय…”हे खुप पूरक वाटतं. सिनेमातलं ‘खळ खळ गोदा’ हे गाणं सिनेमा संपला तरी ओठांवर कायमच रेंगाळत राहतं, यात शंकाच नाही. नाशिकच्या देशमुख कुटुंबाची ही गोष्ट आपण आपल्या कुटुंबासोबत नक्कीच अनुभवायला हवी. 

गोदावरी हा सिनेमा जगण्याचा एक सुखद अनुभव देऊन तर जातोच पण अंतर्मुखसुध्दा करतो. हा सिनेअनुभव तुम्हाला भारावून टाकेल यात तिळमात्र शंका नाही.

Recommended

Loading...
Share