By  
on  

Movie Review: गुंतलेल्या नात्यांची अव्यक्त गोष्ट : ‘कलंक’

करण जोहरच्या सिनेमांची चर्चा निर्मितीपासूनच सुरु असते. ‘मल्टीस्टारर’ कलंकच्या बाबतही नेमकं हेच घडलं. हा सिनेमा करणच्या सगळ्यात जवळ आहे. वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी करणने या सिनेमाच्या निर्मितीचं अवघड काम स्विकारलं. सिनेमाचा टीजर आणि ट्रेलर पाहूनच करणचा हा आतपर्यंतचा सर्वात मोठा सिनेमा असल्याचं बोललं जात आहे. अभिषेक वर्मा दिग्दर्शित या सिनेमात आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, माधुरी दीक्षित आणि आदित्य रॉय कपूर यांच्या अभिनयाने सजला आहे.  

दिग्दर्शक :  अभिषेक वर्मा

कलाकार : आलिया भट्ट, वरुण धवन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू, माधुरी दीक्षित आणि आदित्य रॉय कपूर

रेटिंग : 4 मून

कथानक : या सिनेमाचं कथानक काहीसं गुंतागुंतीचं असलं तरी प्रेक्षकाला कंटाळा येऊ देत नाही. मुळ कथानक रुप (आलिया) आणि जफर (वरुण)च्या अवतीभवती फिरत राहतं. भूतकाळातील काही चुकांमुळे बलराज चौहान ( संजय दत्त) रुपचं लग्न आधीपासून विवाहित असलेलल्या देव चौधरीशी (आदित्य रॉयकपूर) लावून देतो. विशेष म्हणजे याला देवच्या पहिल्या पत्नीची सत्याची (सोनाक्षी सिन्हा) देखील हरकत नसते. पण लग्नानंतर जफर आणि रुपमधील भावबंध अधिकच घट्ट होत जातात. बलराजच्या भूतकाळाचं बहारबेगमशी (माधुरी दीक्षित) खास नातं आहे. पण या नात्याला वैषम्याची किनार आहे. या सिनेमाची पार्श्वभूमी १९४५ च्या आसपास फिरणारी आहे. त्यामुळे हिंदू-मुस्लीम दंगल, फाळणी, गरीब-श्रीमंत भेदभाव या बाबी अनुषंगाने येत राहतात. एकंदरीत सिनेमाचा शेवट कंटाळवाणा वाटत नाही यातच सिनेमाचं यश आहे.

अभिनय : हा सिनेमा सर्वच स्तरावर दर्जेदार आहेच. पण कलाकारांचा अभिनय याला चार चांद लावतो. अपरिपक्व रुप, शीघ्रकोपी जफर, त्यागी सत्या, मानी बहार बेगम, स्वत:त रमलेला देव, प्रतिष्ठेसाठी काहीही करणारा बलराज यांनी सिनेमा अगदी जगला आहे.

सिनेमा का पहावा? :  उत्तम सेट, दर्जेदार अभिनय आणि लव्हस्टोरीमध्ये रस असलेल्या रसिकांनी हा सिनेमा जरूर पहावा. सिनेमातील गाणीही छान आहेत. अभिषेक वर्मांनी दिग्दर्शनाची धुरा उत्तम सांभाळली आहे. तत्व, वचन, प्रेम, त्याग या सगळ्या मुल्यांना एकत्र बांधून ठेवणारा सिनेमा म्हणजे ‘कलंक’.

Recommended

PeepingMoon Exclusive