दिग्दर्शक: पुनीत मल्होत्रा
कलाकार: अनन्या पांडे, टाइगर श्रॉफ, तारा सुतारिया आणि इतर
रेटींग : 3.5 मून
सध्या बॉलीवूडमध्ये तरुणाईला आकर्षित करणाऱ्या सिनेमांची संख्या वाढवली आहे. 'कूछ कूछ होता है', 'कभी खुशी कभी गम', 'कल हो ना हो' सारखे सिनेमे देणाऱ्या करण जोहरने २०१२ साली 'स्टुडन्ट ऑफ द इयर' सिनेमाची निर्मिती करून बॉलीवूडमध्ये एक नवा प्रकार आणला. कॉलेज लाईफच्या अवतीभवती फिरणारं कथानक आणि प्रेमाचा त्रिकोण असलेला सिनेमा सर्वांना आवडला होता. विशेषतः तरुणाईने या सिनेमाला पसंती दर्शवली होती. २०१९ साली पुन्हा एकदा कारण जोहर 'स्टुडन्ट ऑफ द इयर २' या सिनेमाद्वारे हेच कॉलेज लाईफ नव्या पद्धतीने दाखवण्यास सज्ज झाला आहे. आधीच्या सिनेमाप्रमाणे हाही सिनेमा प्रेक्षकांचं मनोरंजन करेल यात शंका नाही.
कथानक
रोहन सचदेवा(टायगर श्रॉफ) हा मध्यमवर्गीय घरातला एक मुलगा असून तो पिशोरीमल चमनदास कॉलेज मध्ये शिकत असतो. कॉलेजमध्ये तो लॉन्ग जंप, डान्स अशा विविध प्रकारांमध्ये भाग घेत असतो. पुढचं शिक्षण घेण्यासाठी तो सेंट टेरेसा कॉलेजमध्ये दाखल होतो. या कॉलेज मध्ये त्याची बालमैत्रीण आणि जिच्यावर तो लहानपणापासून प्रेम करत असतो ती मीया(तारा सुतारिया) सुद्धा शिकत असते. सेंट टेरेसा कॉलेज हे चकचकीत असून या कॉलेज मध्ये उच्चभ्रू वर्गातली मूलं शिकत असल्याने येथे थोडा वर्गभेद असल्याचा दिसून येतो. श्रेया(अनन्या पांडे) आणि मानव(आदित्य सील) ही दोन भावंडं या कॉलेजमध्ये स्टार असतात. पुढे रोहन इथे येऊन 'स्टुडन्ट ऑफ द इयर' ही ट्रॉफी जिंकतो का? या प्रश्नाचे उत्तर स्टुडन्ट ऑफ द इयर २ हा सिनेमा पाहून मिळेल. पहिल्या भागाप्रमाणे याही सिनेमात रोहन-मीया-श्रेया असा प्रेमत्रिकोण पाहायला मिळतो.