पी एम नरेंद्र मोदी
दिग्दर्शक: ओमंग कुमार
निर्माते : संदीप सिंग, आनंद पंडीत, अभिषेक अंकुर आणि इतर
कलाकार: विवेक ओबेरॉय, मनोज जोशी, झरीना वहाब, दर्शन कुमार, बोमन इराणी आणि इतर
वेळ: 2 तास ११ मिनिट
रेटींग : ३ मून
नरेंद्र मोदी या माणसाने एक चहावाला ते पंतप्रधान या पदापर्यंत मारलेली मजल सर्वश्रुत आहे.'पी एम नरेंद्र मोदी' या सिनेमातून नरेंद्र मोदी यांची अविश्वसनीय आणि संघर्षपूर्ण यात्रा रंगवण्यात आलीआहे. विवेक ओबेरॉय हा या सिनेमाचा केंद्रबिंदू आहे. विवेक ओबेरॉयने आपल्या देहबोलीतून, संवादफेकीतून नरेंद्र मोदी रुपेरी पडद्यावर समर्थपणे उभे केले आहेत. कथानक : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पॅनल चर्चेपासून या सिनेमाची सरुवात होते. या चर्चेत मोदींना एक प्रभावी आणि कणखर नेतृत्व म्हणून सर्वजण पाठिंबा देत असलेले दिसतात. गुजरात आणि उर्वरित भारतात मोदींनी स्वतःच्या असामान्य व्यक्तिमत्वाने सर्वांवर प्रभाव टाकला असतो. त्यानंतर हा सिनेमा भूतकाळात जाऊन मोदींचं बालपण दाखवतो. अनेक अडथळ्यांवर मात करत मोदींची राजकीय यात्रा पंतप्रधान पदापर्यंत कशी पोहोचते हा प्रवास या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळतो.
दिग्दर्शन : 'सरबजीत', 'मेरी कॉम' यांसारखे यशस्वी बायोपिकचं दिग्दर्शन करणाऱ्या ओमंग कुमार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. त्यांनी मोदींना या सिनेमातून एका हिरो सारख प्रेक्षकांसमोर आणलं आहे. शिवाय मोदींच्या आयुष्यातल्या काही वादग्रस्त घटनांवर सुद्धा प्रकाश टाकला आहे. जुना काळ त्यांनी सिनेमात योग्य रीतीने उभा केलं आहे. सुभाष शिंदे आणि प्रतिशिल सिंग या दोन मेकअप आर्टिस्टनी सुद्धा आपल्यासमोर सतत दिसणाऱ्या राजकारणी माणसांना रुपेरी पडद्यावर हुबेहूब दाखवलं आहे.
अभिनय : विवेक ओबेरॉयने नरेंद्र मोदींची भूमिका प्रभावीपणे साकारली आहे. अनेक भावनिक प्रसंगातला त्याचा अभिनय पाहण्यासारखा आहे. झरीना वहाब या मोदींची आई हिराबेन मोदी, एका पत्रकाराच्या भूमिकेत दर्शन कुमार, अमित शहांच्या भूमिकेत मनोज जोशी आदी कलाकारांनी सुद्धा आपापल्या भूमिका चांगल्या साकारल्या आहेत. रतन टाटा यांच्या छोट्याश्या भूमिकेत बोमन इराणी सुद्धा लक्षात राहतात.
सिनेमा का पहावा? : येत्या काही दिवसांमध्ये नरेंद्र मोदी या माणसाबद्दल अनेक मतप्रवाह असलेले दिसून येतात. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी बरे-वाईट अनेक निर्णय घेतले असतील. परंतु त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास मात्र थक्क करणार आहे. त्यामुळे मनामध्ये काहीएक विचारप्रवाह न बाळगता सध्याच्या लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात हा सिनेमा तुमचं नक्कीच मनोरंजन करेल.