By  
on  

Movie Review: विकृत पुरुषी मानसिकतेचा पर्दाफाश करणारा 'जजमेंट'

जजमेंट

दिग्दर्शन : समीर रमेश सुर्वे निर्माता : डॉ. प्रह्लाद खंदारे कथा : नीला सत्यनारायण संगीत : नवल शास्त्री

रेटिंग: ३ मून

 

नीला सत्यनारायण यांच्या 'ॠण' कादंबरीवर आधारीत असलेला 'जजमेंट' हा सिनेमा स्त्रियांवरील अन्यायाला आणि अत्याचाराला वाचा फोडतो. पुरुषी मानसिकतेचे विद्रुप रुप तो प्रेक्षकांना दाखवतो. आणि सिनेमा संपल्यावर नकळतपणे आपल्याला अंतर्मुख करतो.

कथानक: रत्नागिरीत राहणारा अग्निवेश साटम हा IAS अधिकारी या कथेच्या केंद्रस्थानी आहे. काहीसा शीघ्रकोपी, विक्षिप्त असा हा माणुस. आपल्या बायकोला मुलगा होत नाही म्हणुन तो तीला अमानुष मारहाण करत असतो. त्याच्या या अत्याचाराला कंटाळुन त्याची बायको मुंबईत राहणा-या वडिलांना फोन करुन अग्निवेशपासुन जीवाला धोका असल्याची बातमी कळवते. जेव्हा तीचे वडील मुंबईहुन रत्नागिरीत पोहचतात तेव्हा ती मेलेली असते. वडिलांना तीच्या मानेवर काही डाग दिसतात. त्यामुळे तीचा मृत्यु नैसर्गिकरित्या झाला नाही याची त्यांना खात्री असते. अखेर ते आपल्या मुलीच्या दोन मुलींना म्हणजेच आपल्या नातींना घेऊन मुंबई गाठतात. आपल्या आईचा मृत्युचं सत्य मोठी मुलगी नेहाला माहीत असतं. परंतु अग्निवेशचा धाक बघता आजोबा नेहाला गप्प रहायला सांगतात. पुढे 15 वर्षानंतर नेहा वकील होऊन आपल्या आईवर झालेल्या अत्याचाराचा बदला घेण्यासाठी अग्निवेशविरुद्ध केस दाखल करते. या केसमध्ये नेहा अत्यंत हुशारीने अग्निवेशची विकृत पुरुषी मानसिकता कशी उघड पाडते, याची कथा जजमेंट सिनेमात बघायला मिळते.

दिग्दर्शन: 'जजमेंट' सिनेमामधील कथानकात प्रेक्षकांना अखेरपर्यंत खिळवुन ठेवण्यात दिग्दर्शक समीर सुर्वे हे यशस्वी झाले आहेत. त्यांनी व्यक्तिरेखांची मानसिकता अचुकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. उदा. मंगेश देसाईने साकारलेला अग्निवेश साटम हा विक्षिप्त माणुस रागाच्या भरात काय करेल याची प्रेक्षकांना सुद्धा धास्ती असते. त्यामुळे व्यक्तीरेखांच्या मानसिकतेशी प्रेक्षकांना जोडण्यात दिग्दर्शकांना निश्चितच यश मिळाले आहे. मध्यंतरानंतरचा कोर्ट रुम ड्रामामधलं नर्मविनोदी आणि गंभीर वातावरणाची सांगड त्यांनी योग्यरित्या घातली आहे.

अभिनय: अभिनयाच्या बाबतीत मंगेश देसाईने लक्षवेधी काम केलं आहे. इतर सिनेमांत संवेदनशील भुमिकांमध्ये झळकणारा मंगेश या सिनेमातुन प्रथमच खलनायकाच्या भुमिकेत प्रेक्षकांसमोर आला आहे. क्रुर, मग्रुर, शीघ्रकोपी आणि विकृती असलेला अग्निवेश साटमच्या भुमिकेत मंगेशने उत्तम अभिनय केला आहे. त्याने ही भुमिकेचे बारकावे अचुक पकडले आहेत. तेजश्री प्रधानने नेहाची भुमिका नैसर्गिक अभिनयाने उत्तम साकारली आहे. आईच्या मरणाचं दुःख, वकील झाल्यानंतरचा सुरुवातीचा नवखेपणा अशा अनेक बाजु तीने अभिनयाद्वारे उत्तम दाखवल्या आहेत. इतर भुमिकांमध्ये माधव अभ्यंकर, शलाका आपटे या कलाकारांनी सुद्धा आपल्या भुमिका चोख वठवल्या आहेत.

 

सिनेमा का पहावा: या सिनेमातुन एका संवेदनशील विषयाची चांगल्या पद्धतीने हाताळणी केली आहे. मंगेश देसाईचा प्रभावी अभिनय हे या सिनेमाचं मोठं आकर्षण आहे. ज्यांना रहस्यमयी थ्रिलर सिनेमांची आवड आहे त्यांनी 'जजमेंट' हा सिनेमा अजिबात चुकवु नये.

Recommended

PeepingMoon Exclusive