By  
on  

Movie Review: स्त्रियांसमोर असलेला पुरुषप्रधान संस्कृतीचा पिंजरा मोडणारा 'बंदिशाळा'

सिनेमा:बंदिशाळा
दिग्दर्शक: मिलिंद लेले
कलाकार: मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे, उमेश जगताप,अजय पुरकर, प्रवीण तरडे, हेमांगी कवी आणि इतर
वेळ: 2 तास 20 मिनिटं
रेटींग: 2 मुन

मराठी सिनेमांमध्ये अनेकदा स्त्री ही सोशिक, पुरुषप्रधान संस्कृतीला बळी पडणारी दाखवली जाते. आजही बलात्कार, लैंगिक शोषण यांसारख्या अनेक अत्याचारांना महिलांना सामोरे जावे लागते. अशावेळेस संपुर्ण पुरुषप्रधान समाजावर आसुड उगारणारी एक महिला पेटुन उठली तर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणुन संजय पाटील लिखित आणि मिलींद लेले दिग्दर्शित 'बंदिशाळा' या सिनेमातुन प्रभावीपणे पहायला मिळतं. 

कथानक:
माधवी सावंत(मुक्ता बर्वे) ही महिला पोलीस अधिकारी पुरुषांचं कैदीगृह सांभाळत असते. परंतु तिचे इतर सहकारी आणि तिच्यावर वचक असणारे तिचे वरीष्ठ पोलीस अधिकारी हे सर्व पुरुष असतात. एकुणच पुरुषांच्या गराड्यात माधवी सावंत ही सक्षमपणे स्वतःचं काम करत असते. कैदीगृहातील अट्टल गुन्हेगारांना वठणीवर आणणं,आणि आपली ड्युटी प्रामाणिकपणे करणं या गोष्टी ती एकटी कर्तव्याप्रमाणे बजावत असते. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीची काही माणसं तिच्या कामांमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. तसेच तिचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा तिच्यावर वारंवार दबाव टाकत असतात. अशावेळेस माधवी या सर्व प्रकारांशी कसा सामना करते? याची कहाणी 'बंदिशाळा' सिनेमातुन पाहायला मिळते. 

दिग्दर्शन:
मिलिंद लेलेंनी सशक्त कथेला थोडा फिल्मी टच दिल्याने 'बंदिशाळा' अनेक वेळेस मुळ कथेपासुन भरकटतो. तसेच दिग्दर्शकांनी माधवी सावंत ही प्रमुख व्यक्तिरेखा सोडल्यास इतर व्यक्तिरेखांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे बाकीच्या व्यक्तीरेखा या प्रभावीपणे समोर येत नाहीत. ही गोष्ट या सिनेमासाठी मारक ठरली आहे. गाणी आणि संगीत सिनेमाला साजेसे आहे. 

अभिनय:
मुक्ता बर्वेच्या दमदार परफाॅर्मन्समुळे हा सिनेमाने शेवटपर्यंत तग धरतो. मुक्ताने माधवी सावंत या महिला पोलीस अधिका-यामधील त्वेष, पुरुषप्रधान संस्कृतीबद्दल असणारी चिड, वरुन सतत दबाव येत असल्याने होणारी घुसमट आपल्या अभिनयाद्वारे उत्तम साकारली आहे. उमेश जगताप आणि शरद पोंक्षे यांनी सुद्धा आपापल्या भुमिका ठीकठाक साकारल्या आहेत. छोट्याश्या भुमिकेत प्रवीण तरडे आणि हेमांगी कवी आपल्या अभिनयाची छाप पाडुन जातात. 

सिनेमा का पहावा?
ज्यांना पोलीस आणि चोर यांच्यातील द्वंद्व दाखवणारे सिनेमे आवडत असतील त्यांनी 'बंदिशाळा' नक्कीच पहावा. मुक्ता बर्वेच्या चाहत्यांना मुक्ताची ही काहीशी वेगळी आणि रावडी भुमिका नक्कीच आवडुन जाईल.

 

Recommended

PeepingMoon Exclusive