कथा : समीर हेमंत जोशी
कालावधी : 120 मिनीटे
दिग्दर्शन: समीर हेमंत जोशी
कलाकार : सिध्दार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, सविता प्रभुणे, राजन भिसे, अविनाश नारकर
रेटींग : 3 मून
आज लॉंग डिसिटन्स रिलेशनशीप म्हणजे काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. आपल्या आजू-बाजूला अशी अनेक जोडपी पाहायला मिळतात. करिअरनिमित्त, नोकरी-व्यवसायानिमित्त अनेकांना आपल्या जोडीदाराचा विरह सहन करत राहावं लागतं. तो दिवसभरातला सर्वात वाट पाहायला लावणारा एक फोन कॉल, झोपमोड करुन दिवसभराच्या मारलेल्या गप्पा, मनातलं दु:ख, आनंद अशा संमिश्र भावना व्यक्त करण्याचं एकमेव हक्काचं ठिकाण. साता-समुद्रापार असलेल्या आपल्या प्रेमाच्या आठवणींचा खजिना काढून डोळ्याच्या कडा ओलावणं आणि तरीही त्या प्रेमाच्या परतीच्या आशेने दररोज नवी उमेद घेऊन जगणं, ह्यात खरं आव्हानं असतं. सुरुवातीला सारं-काही सातवें आसमान पें ! वाटत असतानाच कधी ते दूरवर असलेलं नातं टिकवून ठेवताना सत्व परिक्षा द्यावी लागते, हे आपलं आपल्यालाच कळत नाही. अशाच एका कामानिमित्त विरह सोसणा-या आजच्या तुमच्या-आमच्या सारख्या एका विवाहीत जोडप्याची कथा घेऊन 'मिस यू मिस्टर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
कथानक
कावेरी ( मृण्मयी देशपांडे ) आणि तिचा पती वरूण (सिध्दार्थ चांदेकर) या नवविवाहीत जोडप्याची ही कथा आहे. आर्थिक परिस्थितीमुळे नाईलाजाने वरुणला लंडनची नोकरी पत्करावी लागते. या जोडप्याकडे मग १८ महिने वेगळ राहण्याशिवाय पर्यायच उरत नाही. वरुण लंडनमध्ये तर कावेरी पुण्यात. वरुण परदेशात एकट्याने आपला जम बसवू पाहत असतो तर इथे कावेरी वरुणच्या कुटुंबासह आपली नोकरी सांभाळत तारेवरची कसरतच करत असते. सुरुवातीला सारं काही ऑल इज वेल आणि मस्त सुरु आहे, असं वाटतानांच एकमेकांपासून वेगळे राहिल्याने या नवविवाहित जोडप्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होतो.दोन वर्ष संपल्यावर वरूण परत येतो, पण त्यांच्यातील संबंधांमध्ये तणाव आलेला असतो. वरूण जेव्हा सांगतो की त्याला आणखी पुन्हा दोन वर्षांसाठी लंडनला जावे लागणार आहे, तेव्हा हा तणाव आणखी वाढतो. कावेरी घर सोडून जाते. वरुणची तारेवरची कसरत सुरु होते. व्यावसायिक प्रगती कि संसार, या दुहेरी पेचात तो अडकतो. व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य यांमधील द्विधा मनःस्थितीतून वरूण मार्ग काढू शकेल का? कावेरी आपला संसार वाचविण्यासाठी त्याच्याबरोबर लंडनला जाईल का?दोघांमध्ये अंतरामुळे आलेल्या दुराव्यावर त्यांच्यातील प्रेम मात करू शकेल का? पुन्हा वरुण आणि कावेरी आपल्या संसाराची बुडती नौका सावरु शकतील का? या सर्वांची उत्तरं तुम्हाला सिनेमा पाहतानाच मिळतील.
दिग्दर्शन
उत्तम कथा आणि पटकथेच्या जोरावर सिनेमाची पडद्यावरी मांडणी दिग्दर्शकाने अचूक केली आहे. ह्या कथानकानुसार कलाकारांची योग्य निवड ही आणखी एक जमेची बाजू म्हणता येईल.
अभिनय
जवळपास दहा वर्षांपूर्वी लोकप्रियतेचे उच्चांक गाठलेल्या ‘अग्निहोत्र’ मालिकेतील सिध्दार्थ-मृण्मयीची केमिस्ट्री आजही तशीच आहे, हे त्यांनी ह्या सिनेमातून सिध्द केलं आहे. राजन भिसे आणि सविता प्रभुणे यांनी साकारलेले वरुणचे आई-वडील अगदी तंतोतंत आणि खरेखुरे वाटतात. जिथे जसं वागण्याची खरी गरज आहे तसंच वागणं त्यांनी सहज -सुंदर अभिनय पडद्यावर साकारलाय. मृण्मयीच्या मैत्रीणीची भूमिका साकारणा-या दीप्ती लेलेनेसुध्दा मृण्मयीला उत्तम साथ दिली आहे. तर पाहुणा कलाकार म्हणून झळकलेला अभिनेता ऋषिकेश जोशी चांगलाच लक्षात राहतो.
सिनेमा का पाहावा?
आज अनेक जोडपी लॉन्ग डिस्टन्स रिलेशनशीपमध्ये राहतायत. त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मग अशावेळी त्यातून मार्ग कसा काढायचा, त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना कशाप्रकारे हाताळायचं या प्रश्नांची उत्तरं जर शोधायची असतील तर तुम्ही हा सिनेमा आवर्जुन पाहावा. न जाणो कधी अचानक तुमच्यात ‘का रे दुरावा निर्माण’ होईल आणि तेव्हा नेमकं काय करावं हे सुचणार नाही.