Movie Review: हरवलेल्या जगण्याला नवी दिशा देणारा 'स्माईल प्लीज'

By  
on  

स्माईल प्लीज 

दिग्दर्शन: विक्रम फडणीस 

कलाकार : मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, सतीश आळेकर, तृप्ती खामकर, आदिती गोवित्रीकर 

रेटिंग: ३ मून 

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी अडचणी असतात. प्रत्येकाला या अडचणींशी सामना करत स्वतःचं अस्तित्व हरवुन बसतात. तर काहीजण या अडचणींना सामोरे जात जिद्दीने स्वतःचं आयुष्य जगत असतात. विक्रम फडणीस दिग्दर्शित 'स्माईल प्लीज' मधुन संघर्षपुर्ण जीवन हसतमुखाने जगणा-या एका फोटोग्राफरची भावस्पर्शी कहाणी पाहायला मिळते.

कथानक:
नंदिनी(मुक्ता बर्वे) ही नवरा शिशिर(प्रसाद ओक)पासुन विभक्त आपल्या वडिलांच्या(सतीश आळेकर) घरी राहते. ती पेशाने एक एक फॅशन फोटोग्राफर आहे. तिला काही गोष्टींचा सतत विसर पडत असतो. एक दिवशी फार छोट्या तरीही महत्वाच्या गोष्टी विसरते. आपल्याला काय होतंय हे तिला कळत नाही. म्हणुन ते जाणुन घेण्यासाठी आणि आपल्याला नेमकं काय झालंय हे पडताळण्यासाठी तिची डाॅक्टर मैत्रीण असलेली अंजलीची(आदिती गोवित्रीकर) भेट घेते. त्यानंतर काही वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर नंदिनीला डायमेन्शिया म्हणजेच विसरण्याचा आजार झाल्याचे निदान होतो. त्यानंतर सुरु होतो नंदिनीचा डायमेन्शिया विरुद्धचा लढा. अशातच नंदिनीच्या घरी विराज(ललित प्रभाकर) हा पाहुणा म्हणुन धडकतो. त्यानंतर विराज या आजारातुन नंदिनीला बाहेर काढण्यासाठी छोटे छोटे प्रयत्न करत असतो. या प्रयत्नातुन नंदिनी पुन्हा स्वतःला गवसते का? आणि ती या आजारातुन बरी होती का? याची उत्तरं 'स्माईल प्लीज' मधुन पाहुन मिळतील.

दिग्दर्शन:

विक्रम फडणीस स्वतः फॅशन डिझायनर असल्याने त्यांना नंदिनी या व्यक्तिरेखेचा आत्मा अचुक गवसला आहे. फक्त नंदिनीच्या आजारपण रेखाटताना सिनेमा थोडा संथ होतो. पण तरीही सफाईदार दिग्दर्शनाने विक्रम फडणीस यांनी सिनेमावरची आपली पकड सुटु दिली नाही. त्यांनी प्रत्येक व्यक्तिरेखेला योग्य तो न्याय दिला आहे. त्यामुळे नंदिनीपासुन ते घरात काम करणा-या ज्योतीपर्यंत सिनेमातली सर्व पात्र लक्षात राहतात. 

अभिनय:
नंदिनीच्या भुमिकेत असणारी मुक्ता बर्वे या सिनेमाची खरी जान आहे. मुक्ता बर्वैने फॅशन फोटोग्राफरचा आत्मविश्वास योग्य दाखवला आहे. तसेच डायमेन्शिया झाल्यानंतर होणारी तगमग, चिडचीड, घुसमट तरीही नंदिनीची जगण्याची उमेद मुक्ताने प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. सतीश आळेकर नंदिनीच्या वडलांच्या भुमिकेत छाप पाडतात. अनेक भावनिक प्रसंगात सतीळ आळेकरांचा अभिनय पाहण्यासारखा आहे. ललित प्रभाकरने नंदिनीला डायमेन्शियातुन बाहेर काढणा-या विराजची भुमिका सुंदर साकारली आहे. प्रसाद ओक, तृप्ती खामकर आदी कलाकार आपल्या भुमिकांमध्ये चपखल बसले आहेत. 

सिनेमा का पहावा:
मुक्ता बर्वेचे चाहते असाल तर 'स्माईल प्लीज' तुमच्यासाठी आहे. खुप दिवसांनी मराठीमध्ये चांगल्या कथानकाला भावनिक स्पर्श असणारा सिनेमा आला आहे. 'हृदयांतर' विक्रमने 'स्माईल प्लीज'च्या माध्यमातुन पुन्हा एकदा एक चांगला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. निराशापुर्ण जगण्यात सकारात्मकतेची नवी ऊर्जा देणारा 'स्माईल प्लीज' आवर्जुन पाहण्यासारखा आहे.

 

Recommended

Loading...
Share