सिनेमा : आप्पा आणि बाप्पा
निर्माते/दिग्दर्शक : गरीमा धीर, जलज धीर
कलाकार : दिलीप प्रभावळकर, भरत जाधव, सुबोध भावे, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे
लेखक : अश्वनी धीर व अरविंद जगताप
रेटींग: 2.5 मुन
माणुस आणि देव यांच्या नात्यावर आधारीत अनेक सिनेमे हिंदी आणि मराठी सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अगदी 'ओह माय गाॅड' या सिनेमाने माणुस आणि देवाच्या नात्यावर सुंदररित्या भाष्य केले. याच नातेसंबंधावर आधारीत 'आप्पा आणि बाप्पा' हा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
कथानक:
पुण्यात राहणारे आप्पा अर्थात गोविंद कुलकर्णी(भरत जाधव) आपले वडील रमाकांत कुलकर्णी(दिलीप प्रभावळकर) आणि बायको, मुलांसोबत राहत आहेत. आप्पांचे वडील हे देवाधिकांची पुजा करणारे आणि काहीसे परंपरावादी असणारे. मृत्युच्या आधी गणेशोत्सवात सत्यनारायणाची पुजा घरामध्ये आयोजीत करुन त्यानिमित्ताने शंभर एक माणसांना घरात जेवण घालण्याची त्यांची इच्छा असते. कुलकर्णी कुटूंबाची ऐपत नसते तरीही रमाकांत कुलकर्णी यांच्या इच्छेखातर घरात हा मोठा घाट घातला जातो. या सगळ्याचा खर्च उधारीवर करत ही उधारीची रक्कम लाखाच्या घरात जाते. अखेर ही उधारीची रक्कम फेडण्यासाठी आपले वडील रमाकांत यांची मुदत ठेव(FD) वापरण्याचा एकमेव पर्याय कुलकर्णी कुटूंबाकडे असतो. परंतु बँक ही रक्कम देण्यास टाळाटाळ करते. अखेर आप्पांना या संकटातुन बाहेर काढण्यासाठी साक्षात बाप्पा(सुबोध भावे) अवतरतो. अखेर बाप्पा आप्पांना या संकटातुन बाहेर काढतो का? आप्पांच्या डोक्यावरची उधारी मिटते का? या सर्वांची उत्तरं हा सिनेमा पाहुन मिळतील.
अभिनय:
आप्पांच्या भुमिकेत भरत जाधव यांनी नेहमीप्रमाणे आपल्या अभिनयाचे रंग भरले आहेत. खुप काळानंतर भरत जाधव यांचं सिनेमातले दर्शन नक्कीच त्यांच्या चाहत्यांसाठी सुखावह आहे. सुबोध भावेने यांनी नेहमीच्या सहजतेने बाप्पाची भुमिका साकारली आहे. सुबोध भावे-भरत जाधव यांची अभिनयाची जुगलबंदी पाहायला मजा येते. दिलीप प्रभावळकर यांनी आपली भुमिका गांभीर्याने वठवली आहे. इतर कलाकारांनी सुद्धा आपापल्या भुमिका प्रामाणिकपणे साकारल्या आहेत.
सिनेमा का पाहावा?
देवांशी संबंधित पुजाधिकांमध्ये माणुस कसा भरडला जातो यांचं समर्पक चित्रण 'आप्पा आणि बाप्पा' मध्ये करण्यात आलं आहे. सिनेमा काही ठिकाणी संथ झाला तरीही विषय प्रेक्षकांपर्यंत दिग्दर्शक निश्चितच यशस्वी झाला आहे. भरत जाधव-सुबोध भावे यांची अभिनय जुगलबंदी पाहण्यासाठी हा सिनेमा तुमच्यासाठी पर्वणी असणार आहे.