सिनेमा : हिरकणी
दिग्दर्शक : प्रसाद ओक
कलाकार : सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर
लेखक : चिन्मय मांडलेकर कालावधी: 1 तास 30 मिनिटं
रेटिंग:3.5 मून
मराठीत सध्या ऐतिहासिक सिनेमांचे वारे वाहू लागले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यातूनही दिवाळी आणि भव्य दिव्य सिनेमे हे जणू समीकरणच बनून गेलं आहे. यंदाच्या दिवाळीत आपल्या पाठ्यपुस्तकातील ‘हिरकणी’ रसिकांच्या भेटीला आली आहे. म्हणूनच कवितेतील ही ‘हिरकणी’ मोठ्या पडद्यावर पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
कथानक:
आपण सर्वांनी पाठ्यपुस्तकात ज्या हिरकणीची शिकवण घेतली त्याप्रमाणेच सिनेमाचं कथानक सिनेमात आहे. रायगडावर रोज दुध घेऊन जाणारी हिरा गवळण एकदा गडाचे दरवाजे सुर्यास्तानंतर बंद झाल्यावर गडावरच अडकते. आणि गडाखाली असलेल्या आपल्या घरी जाण्याचे तिचे सर्व मार्गच बंद होतात. घरी एकट्या असलेल्या तान्ह्या-भुकेल्या बाळाच्या विवंचनेत ती वेडीपिशी होते. अशा वेळी ती गडाच्या पश्चिम कडा ज्यातून वारा आणि पाणीच जाऊ शकतं अशा ठिकाहून ती खाली उतरायचा निर्णय घेते. यावेळे महाराजांना तिच्या शौर्याचं कसं कौतुक वाटतं. हे या सिनेमातून दिसलं आहे.
दिग्दर्शन:
हिरकणीच्या पाठ्यपुस्तकातील कथेवर सिनेमा साकारणं हेच मोठं धाडसाचं काम आहे. दिग्दर्शक प्रसाद ओकने ही हिरकणी पडद्यावर साकारण्याचं शिवधनुष्य लीलया पेललं आहे, हे सिनेमा पाहताना जाणवतं. सिनेमाचा प्रत्येक सीन इतिहातील संदर्भाचा अभ्यास करून साकारला आहे हे पदोपदी सिनेमा पाहताना जाणवतं. सिनेमाच्या पुर्वार्धात हिरकणी आणि शिवराज्याभिषेक पाहता येतो तर तिच्या साहसाचा अनुभव मध्यंतरानंतर येतो. या सिनेमातील काही दृश्यांसाठी व्हिएफएक्स तंत्राचा वापर केला आहे. त्यामुळे दृश्यांची परिणामकारता अधिक जाणवते.
संगीत:
सिनेमातील सर्वच गाणी श्रवणीय आहेत. संगीत ही या सिनेमाची जमेची बाजू आहे. शिवराज्याभिषेक गीत हे संगीतप्रेमींसाठी पर्वणी आहे. तर ‘जगणं हे न्यारं झालं जी’ व आशाताईंनी गायलेली ‘आईची आरती’ या गाण्यांना तोड नाही.
अभिनय:
या सिनेमात सोनालीचा नॉन ग्लॅमरस लूक आहे. ‘हिरा’ गवळण आणि बाळासाठी व्याकुळ झालेली आई तिने अत्यंत कुशलतेने साकारली आहे. याशिवाय या सिनेमात हिराचा पती साकारणारा अभिनेता जीवाजीराव म्हणजेच अमित खेडेकरनेही स्वराज्याच्या शिलेदाराची भूमिका उत्तम साकारली आहे.
सिनेमा का पहावा?
आजच्या सोशल मिडियाच्या युगात जगणा-या तरुणाईला साडेतीनशे वर्षांपुर्वी बाळासाठी एका शुर मातेने केलेल्या धाडसाची कथा जाणून घेण्याचं उत्तम माध्यम हा सिनेमा आहे. यंदाच्या दिवाळीत या ऐतिहासिक फराळाचा आनंद घेण्यास हरकत नाही....