सिनेमा: खारी बिस्कीट
दिग्दर्शक: संजय जाधव
कलाकार: आदर्श कदम, वेदश्री खाडिलकर, संजय नार्वेकर, नंदिता पाटकर, सुशांत शेलार आणि इतर
संगीत: सूरज-धीरज
रेटिंग: ३ मून
बहीण-भाऊ हे नातं काहीसं वेगळं. काहीसे मस्तीखोर, उगाच एकमेकांना चिडवणारे आणि बोलुन दाखवत नसले तरी एकमेकांवर प्रेम करणारे, काळजी घेणारे बहीण-भाऊ सगळीकडे पाहायला मिळतात. संजय जाधव दिग्दर्शित 'खारी बिस्कीट' या सिनेमात बहीण-भावाचं हे गोड नातं अनुभवायला मिळतं. हा सिनेमा पाहताना प्रत्येकाला आपल्या भावाची किंवा बहिणीची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
कथानक:
मुंबईतील एका झोपडपट्टीत राहणारे बहीण-भाऊ म्हणजे खारी(वेदश्री) आणि बिस्कीट(आदर्श). एका अपघातात त्यांच्या आईचं निधन होतं. त्यानंतर पाहता येत नसलेल्या खारीसाठी तिचा भाऊ बिस्कीट हा आई-बाबा आदि सर्व जबाबदारी पार पडत असतो. खारीला कधीही न दुखवणारा आणि तिची स्वप्नं पुर्ण करण्यासाठी जीवाचं रान करणारा खारीचा भाऊ बिस्कीट. 2011 साल सुरु होतं. सगळीकडे वर्ल्डकपचा माहोल असतो. सचिन तेंडुलकरचा शेवटचा वर्ल्डकपची सर्वत्र चर्चा असल्याने खारी सुद्धा बिस्कीटजवळ सचिन तेंडुलकरला भेटण्याची आणि वर्ल्डकप पाहण्याची इच्छा व्यक्त करते. खारीने सांगीतलेली ही इच्छा बिस्कीट कसा पुर्ण करतो? त्यासाठी त्याला कोणत्या अडथळ्यांना सामोरे जावे लागते? याची गोष्ट म्हणजे 'खारी बिस्कीट'.
दिग्दर्शन:
'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी', 'तु ही रे', 'ये रे ये रे पैसा' सारखे काहीसे व्यावसायिक सिनेमे बनवणा-या संजय जाधव यांनी 'खारी बिस्कीट'च्या माध्यमातुन लहान मुलांचं निरागस जग प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवलं आहे. खारी, बिस्कीट आणि या दोघांच्या छोट्या दोस्तांची मजा-मस्ती संपुर्ण सिनेमात त्यांनी अचुकपणे पेरली आहे. हे सर्व दाखवण्यात उत्तरार्धामध्ये सिनेमा थोडा लांबला आहे. सुरज-धीरज या संगीतकार जोडीने 'खारी बिस्कीट'ला दिलेलं संगीत आणि गाणी श्रवणीय आहेत.
अभिनय:
खारीच्या भुमिकेत वेदश्री खाडीलकर आणि बिस्कीटच्या भुमिकेत आदर्श कदम या दोघांनी आपल्या भुमिका उत्तम साकारल्या आहेत. विशेष उल्लेख करायला हवा तो बिस्कीट झालेल्या आदर्श कदमचा. बहिणीच्या इच्छा पुर्ण करण्यासाठी झगडणारा, प्रसंगी स्वतःच्या तत्वांना मुरड घालणारा बिस्कीटची तगमग आदर्शने समर्थपणे साकारली आहे. स्क्रीन स्पेस कमी असला तरी वाट्याला आलेल्या भूमिकांमधून नंदिता पाटकर, संजय नार्वेकर आणि सुशांत शेलार आपली छाप पाडतात. इतर बालकलाकारांनी सुद्धा सिनेमात धमाल केली आहे.
सिनेमा का पाहावा?
सध्या सुट्ट्यांचा माहोल आहे. तसंच खुप दिवसांनी मराठीमध्ये लहान मुलांसाठी एक उत्तम सिनेमा आला आहे. पण छोट्यांपासुन मोठ्यांपर्यंत सर्वजण 'खारी बिस्कीट'चा तितकाच आनंद घेऊ शकतात. संजय जाधव यांच्या सिनेमांचे चाहते असाल तर त्यांचा हा वेगळा सिनेमा तुमचं निश्चितच मनोरंजन करेल यात शंका नाही.