सिनेमा : गर्ल्स
दिग्दर्शक : विशाल देवरुखकर
निर्माता : नरेन कुमार
लेखक : हृषिकेश कोळी
कलाकार : अंकिता लांडे, केतकी नारायण, अन्विता फलटणकर, पार्थ भालेराव. देविका दफ्तरदार. अतुल काळे, स्वानंद किरकिरे
आजवर अनेक मराठी तसेच हिंदी सिनेमांमध्ये मुलांना असणारे प्राॅब्लेम्स, ते करत असलेली मजा-मस्ती दर्शवणारे अनेक सिनेमे आले आहेत. परंतु खास मुलींना केंद्रस्थानी ठेऊन त्यांचे भावविश्व दाखवणारे सिनेमे हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आजवर आले आहेत. मराठीत 1999 साली आलेल्या चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित 'बिनधास्त' या सिनेमातुन असा प्रयत्न झाला होता. परंतु त्यानंतर 20 वर्षांनी 'गर्ल्स'च्या माध्यमातुन पुन्हा एकदा आजच्या तरुणींचे भावविश्व दाखवणारा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
कथानक:
'गर्ल्स'ची कथा मुलींच्या भावविश्वाभोवती फिरते. मती(अंकीता लांडे) ही सर्वसामान्य घरातली एक मुलगी. बाबांची सततची बदली आणि मुलींबद्दल टिपीकल विचारसरणी असलेल्या आईच्या सततच्या टोमण्यांमुळे कंटाळलेली. कोल्हापुरसारख्या शहरात राहत असुनही आपलं काॅलेजविश्व मनासारखं जगु न शकणा-या मतीला सोलो ट्रीप करण्याची भारी हौस. परंतु घरच्या वातावरणामुळे तिला स्वतःच्या इच्छा आकांक्षांना मुरड घालावी लागते. परंतु कोल्हापुरात तिचा नव्याने झालेला मित्र एस.डी.पी. (पार्थ भालेराव) मतीला यामध्ये मदत करतो आणि मग मती अखेरीस आई-बाबांना कसोशीने पटवुन गोव्याला सोलोट्रीपला जाते. गोव्याला गेल्यावर मतीला तिच्यापेक्षा भिन्न स्वभावाच्या रुमी(अन्विता फलटणकर) आणि मॅगी(केतकी नारायण) या दोन मैत्रीणींसोबत तिची दोस्ती होते. या दोघींसोबत मतीला तिचं हरवलेलं भावविश्व पुन्हा गवसतं आणि तिच्या मनात असलेल्या इच्छा काहीअंशी पुर्ण करता येतात. त्यानंतर मतीचं बदललेलं भावविश्व तिचे आई-वडील स्वीकारतात का? या तिघींच्या बिनधास्त वागण्याने त्यांना कोणत्या अडजणींना सामोरे जावे लागते? या सर्व प्रश्नांची उत्तरं 'गर्ल्स' पाहुन मिळतात.
दिग्दर्शन:
'बाॅईज', 'बाॅईज 2' सारख्या सिनेमांचे दिग्दर्शन करणारे विशाल देवरुखकर यांनी 'गर्ल्स' सुद्धा तितक्याच ताकदीने दिग्दर्शित केला आहे. हृषिकेश कोळी यांचे संवाद विशाल देवरुखकर यांचं दिग्दर्शन कमाल होतं. संपुर्णपणे मुलींच्या भावविश्वावर सिनेमा बनवण्याचं आव्हान विशाल देवरुखकरांनी समर्थपणे पेललं आहे. प्रफुल्ल-स्वप्नील या संगीतकार जोडीने 'गर्ल्स'ला राॅकींग संगीत दिले आहे.
अभिनय:
केतकी नारायण, अंकीता लांडे आणि अन्विता फलटणकर या तिन्ही 'गर्ल्स' धमाल दोस्ती आणि केमिस्ट्री सिनेमात छान जुळुन आली आहे. तिघींनी स्वतःच्या भुमिकांचं महत्व समजुन कमाल अभिनय केला आहे. छोट्याश्या भुमिकेत पार्थ भालेराव सुद्धा नेहमीप्रमाणे धमाल करतो. इतर भुमिकांमध्ये असलेले देविका दफ्तरदार, अतुल काळे, सुलभा आर्य आणि स्पेशल भुमिकेत असलेल्या स्वानंद किरकिरे यांनी सुद्धा आपल्या भुमिका उत्तम साकारल्या आहेत.
सिनेमा का पाहावा?
मराठीत स्त्रीप्रधान सिनेमांची निर्मिती फार कमी होते. 'गर्ल्स'च्या निमित्ताने आजच्या तरुणींच्या विचारांना केंद्रस्थानी असणारा सिनेमा आला आहे. त्यामुळे फक्त मुलींनीच नव्हे तर मुलांनाही या 'गर्ल्स'ने केलेली धमाल अनुभवायला हरकत नाही.