दिग्दर्शक: तृप्ती भोईर
कलाकार: तृप्ती भोईर, सुबोध भावे, उषा नाडकर्णी, तानाजी गालगुंडे, जयंत वाडकर
वेळ: 2 तास
रेटींग : 2 मून
सिनेमा म्हटलं की एक तर तो सस्पेन्स थ्रीलर पठडीतला असतो किंवा सामाजिक विषयावर भाष्य करणारा आणि प्रेक्षकांपर्यंत संदेश पोहचवणारा, एखादी शिकवण देणारा असतो. बहुतांश इतर सिनेमे हे निखळ मनोरंजन करणारे, विनोदांची आतिषबाजी करणारे असतात, ज्याचा कुठलाही विचार न करता फक्त मनोसक्त आनंद घ्यायचा असतो. पण कधी कधी या फक्त मनोरंजनाच्या प्रयत्नासोबत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला जातो, पण या नादात जरा गोष्टी हाताबाहेर जातात, असंच काहीस नुकत्याचं प्रदर्शित झालेल्या ‘अगडबम’ या आठ वर्षांपूर्वी आलेल्या मराठी सिनेमाचा सिक्वेल तृप्ती भोईर निर्मित-दिग्दर्शित ‘माझा अगडबम’सोबत झालं आहे.
कथानक महाकाय शरीर असलेल्या अगडबम नाजूकाची (तृप्ती भोईर) ही गोष्ट आहे. ती एक सर्वसामान्य गृहिणी असते. पती रायबा (सुबोध भावे) आणि सासू (उषा नाडकर्णी) असं तिचं कुटुंब आहे. खाणं हा तिचा छंद असतो. नाजूकाचे वडील कुस्तीपटू असतात. त्याचं एक आव्हान पूर्ण करण्यासाठी नाजूकासुध्दा कुस्तीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्णय घेते. तिला वडिलांना सिध्द करुन दाखवायचं असतं. पण यासाठी ती पुरुष वेषाचा आधार घेते आणि आपली ओळख लपवून ठेवते. एक स्त्री हे करुन दाखवू शकते हा यामागचा अट्टाहास असतो. पण मग नेमकं काय घडतं, नाजूकाच्या पतीला व सासूला हे समजेल तेव्हा काय होईल. अगडबम शरीरामुळे नाजुकाला काय अडचणी तर येत नाही ना, ती ही रेसलिंगची स्पर्धा जिंकू शकेल का, हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल.
दिग्दर्शन तृप्ती भोईर यांच्य ‘अगडबम’ला प्रेक्षकाचीं पसंती मिळाली होती. त्यामुळे ‘माझा अगडबम’कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. पण दिग्दर्शनात काही उणिवा जाणवतात. कथानक उगीचच वाढत गेल्यासारखे वाटते. मध्यांतरानंतर सिनेमा फारच रटाळ होऊ लागतो. ज्या गोष्टी अधोरेखित करायच्या आहेत त्यापेक्षा इतर गोष्टींना जास्त महत्त्व दिलं गेलंय. सिनेमात अनेक ठिकाणी फक्त अतिशयोक्ती पाहायला मिळते.
अभिनय ‘नाकापेक्षा मोती जड’ या उक्तीप्रमाणेच भारीभक्कम मेकअप करुन सतत वावरणं हे अभिनेत्री तृप्ती भोईरने नाजूका साकारत सहज पेललं आहे. सुबोध भावे, उषा नाडकर्णी, तानाजी गालगुंडे आणि कान्हा भावे या सर्वांनीच आपापल्या वाटेला आलेल्या भूमिका अगदी प्रामाणिकपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळे सिनेमा पाहाताना जरा बरं वाटतं.
सिनेमा का पाहावा? विषय बालबोध वृत्तीकडे थोडासा झुकणारा असल्याने महाकाय अगडबम नाजूकाला पाहून लहान मुलं मात्र हा सिनेमा एन्जॉय करु शकतील