दिग्दर्शक: अभिजीत देशपांडे
कलाकार: सुबोध भावे, सुमित राघवन, मोहन जोशी, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, आनंद इंगळे, नंदिता धुरी, वैदही परशुरामी
वेळ: 2 तास
रेटींग : 3-1/2 मून
चरित्रपट सिनेमे मराठी सिनेसृष्टीसाठी काही नवीन नाहीत. पण एखाद्या कलाकाराच्या जीवनावर आधारित सिनेमा असेल तर त्यात त्या कलाकाराचा उदय व त्याच्या जीवनातील चढ-उतार आणि अस्तापर्यंतच्या सर्व सखोल गोष्टींचा अभ्यास करुन त्यातील महत्त्वाच्या निवडक गोष्टी मांडणं गरजेचं असतं. असाच एक प्रामाणिक प्रयत्न ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ सिनेमाच्या निमित्ताने करण्यात आला आहे. अभिनेता सुबोध भावे याने रंगभूमीचे पहिले सुपरस्टार काशिनाथ घाणेकर यांची भूमिका सहज आणि लिलया पेलून आपणच सबकुछ असल्याचं सिध्द केलं आहे. रंगभूमीच्या सुवर्णकाळ पुन्हा एकदा या सिनेमामुळे अनुभवता येतो.
कथानक डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या कारकिर्दीचा काळ आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी यावर सिनेमाचं कथानक आधारित आहे. काशिनाथ घाणेकर (सुबोध भावे) हे डॉक्टर असले तरी त्यांना अभिनयाच्या वेडाने झपाटले होते. अभिनय क्षेत्रात कारकिर्द करताना त्यांची पत्नी इरावती (नंदिता धुरी) देखील त्यांना खंबीर साथ देते व पदोपदी प्रोत्साहित करते. अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवल्यावर या नटाच्या आयुष्यात नेमकं काय काय घडतं, वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यात कशा घडामोडी घडतात, या नटाचे संपूर्ण आयुष्य कसं चित्तथरारक होतं हे तुम्हाला सिनेमा पाहिल्यावरच जाणून घेता येईल.
दिग्दर्शन लेखक-दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी काशिनाथ घाणेकर यांचा जीवनपट पडद्यावर मांडण्याचा अभ्यासपूर्वक प्रामाणिक प्रयत्न जरी केला असला तरी थोड्या त्रुटी जाणवतातच. त्यापैकी महत्त्वाचं म्हणजे 60-70 चं दशक उभारण्यासाठी सेट्सचा वापर करण्यात आला असला तरी अनेक सीन्समध्ये तोच तोच सेट पाहणं कंटाळवाणं वाटतं. घाणेकरांची व्यावसायिक कारकिर्द दाखवताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी फारच थोडक्यात आटोपण्यात आल्या आहेत. तसंच म्हणायचं झालं तर कलाकारांच्याबाबतीत सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी, आनंद इंगळे, वैदही परशुरामी यांच्या व्यक्तिरेखांच्या वाट्याला फारच कमी लांबीची भूमिका आलीय. त्यामुळे संपूर्ण सिनेमा म्हणजेच फक्त आणि फक्त सुबोध भावेच. सिनेमात जान आणतात ते सिनेमाचे संवाद. एकदम....कडक...व ‘उसमें क्या है..’ या संवादामुळे काशिनात घाणेकर आपल्याला उमगतात.
अभिनय अभिनेता सुबोध भावेच्या अभिनयाने हा सिनेमा सजलाय. एखाद्या वन मॅन आर्मीप्रमाणे तो सिनेमाभर वावरतो. इतर भूमिका या फक्त त्याची भूमिका उत्कृष्ट व्हावी यासाठीच साकारण्यात अल्यात असंच वाटतं. रायगडाला जेव्हा जाग येते नाटकातला ‘संभाजी’, गारंबीचा बापू मधला ‘बापू’, अश्रूंची झाली फुले नाटकातला ‘लाल्या’ या घाणेकरांच्या गाजलेल्या भूमिका हुबेहूब साकारत आपण गुणी अभिनेता असल्याचं पुन्हा एकदा सुबोधने सिध्द केलं आहे. सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, सुमीत राघवन यांच्या वाट्याला लहान भूमिका आल्या आहेत. पण त्यांनी त्या चोख बजावल्या आहेत. प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत असलेल्या प्रसादने त्याची भूमिका अप्रतिम साकारत सुबोधला उत्तम साथ दिली आहे.
सिनेमा का पाहावा? आजच्या पिढीला घाणेकर समजून घेता यावे आणि एका नटाचा संघर्षमय प्रवास समजण्यासाठी व रंगभूमीचा तो सुवर्णकाळ अनुभवण्यासाठी हा सिनेमा संपूर्ण कुटुंबासोबत यंदाच्या दिवाळीत पाहणं एक पर्वणीच आहे.