सिनेमा : ‘भयभीत’
दिग्दर्शक : दिपक नायडू
निर्मिती - शंकर रोहरा, दिपक नारायणी
कलाकार : सुबोध भावे, मृणाल जाधव, पूर्वा गोखले, मधू शर्मा, गिरीजा जोशी, यतीन कार्येकर
कालावधी : 1 तास 50 मिनिटे
रेटींग : 3 मून्स
कधी धो धो कोसळणारा पाऊस कधी घनदाट जंगल तर कधी अस्वस्थ करणारं स्वप्न, हे वाचून तुम्हाला थरारक वाटत असेल ना ? ते पाहूनही तुम्हाला भिती वाटेल असा आहे ‘भयभीत’ हा सिनेमा.
अभिनेता सुबोध भावे, बालकरलाकार मृणाल जाधव, भोजपूरी सिनेमांमध्ये प्रसिद्ध असणारी अभिनेत्री मधू शर्मा, मालिकांनंतर पहिल्यांदाच सिनेमात काम करणारी अभिनेत्री पूर्वा गोखले, अभिनेत्री गिरीजा जोशी, प्रसिद्ध अभिनेता यतीन कार्येकर अशी स्टारकास्ट या सिनेमात आहे. शेखर जो साकारलाय सुबोधने आणि रश्मी जी साकारलीय पूर्वाने, या जोडप्याची गोंडस मुलगी श्रेया असं कुटूंब या सिनेमात दाखवलं आहे. मात्र एका वळणावर असं काही घडतं ज्याने वडिल आणि मुलगी एवढचं कुटूंब राहतं. यात वडिल-मुलीमध्ये आलेला दुरावा आणि त्याची कारणं हे रहस्यमयी रुपात दाखवलयं. डॉ. काव्या जी साकारली भोजपूरी अभिनेत्री मधू शर्माने, जिची एन्ट्री सिनेमात एक वेगळा ट्विस्ट आणते. यात गिरीजा जोशीचीही महत्त्वाची भूमिका आहे. या सगळ्यात यतिन कार्येकर यांची रहयस्यमयी एन्ट्री ज्याने कथेला वेगळं वळणं मिळतं.
बऱ्याच वर्षांपूर्वी या सिनेमाचं चित्रीकरण झालं असून सिनेमा पाहताना ते जाणवतं. त्यामुळे बऱ्याच कालावधी पूर्वीचा सिनेमा सिनेमागृहात पाहतोय असही हा सिनेमा पाहताना वाटतं. मात्र तरीही अनुभवी कलाकारांच्या अभिनयानं नटलेला हा सिनेमा पाहणं रंजक वाटतं. सिनेमातील काही सीन्स हृद्याचे ठोके वाढवतील तर काही थरारक सीन्स तुम्हाला खुर्चीत खिळवून ठेवतील. सुबोध भावेच्या अभिनयान काही सीन्सला वजन आलयं, तर हिंदी सिनेमांमध्ये, मालिकांमध्ये काम केलेली बालकलाकार मृणालचं या सिनेमासाठी विशेष कौतुक. कमी संवाद असतानाही मृणालने तिच्या अभिनयानं सिनेमातील रहस्याची बाजू उत्तम सांभाळली आहे. मधू शर्माचा पहिलाच मराठी सिनेमा असला तरीही डॉक्टरच्या आणि पात्राच्या मैत्रिणीच्या भूमिकेत ती योग्य वाटते. पूर्वा गोखले आणि सुबोध भावे या सिनेमाच्या निमित्ताने बऱ्याच वर्षांनी एकत्र दिसत आहेत. 'कुलवधू' मालिकेनंतर ही जोडी या सिनेमाच्या निमित्ताने एकत्र पाहायला मिळतेय. मात्र त्यांचे सीन्स फारसे नसल्याने थोडी निराशा होते. त्यांचे आणखी एकत्र सीन्स पाहायला नक्की आवडले असते. मात्र सिनेमाच्या कथेत त्याची गरज नसल्याने ते योग्य वाटतयं. दिपक नायडू यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलय. याआधी त्यांनी ‘आयला रे’, ‘वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’, ‘किड क्रिश-4’ या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी त्यांनी लेखक, एडिटर म्हणूनही काम केलं आहे. दिग्दर्शनाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे सीन आणखी प्रभावी पद्धतीनं दाखवता आले असते असं जाणवतं. पूर्वार्धाचा वेग कमी असला तरी पूर्वार्धात थरारक दृश्ये आहेत मात्र उत्तरार्ध रहस्यांमुळे मनोरंजक ठरतो.
सिनेमाच्या पूर्वार्धात दोन गाणी दाखवण्यात आली आहेत. मात्र मंदार चोळकरने लिहीलेलं ‘सलते’ हे गाणं अर्जित सिंगच्या आवाजात ऐकायला छान वाटतयं. नकाश अझीजचं संगीत आणि विशेषकरून सिनेमाचं पार्श्वसंगीताने या रहस्यपटात महत्त्वाची धुरा सांभाळली आहे. सिनेमाला वासू यांचं उत्तम छायांकन लाभलं आहे.
अगदी 1 तास 50 मिनीटे या कालावधीत तुम्हाला रहस्यपट आणि भयपट अशा दोन्ही चव चाखायला मिळतात. शेवटापर्यंत हा सिनेमा तुम्हाला भयभीत करतो मात्र सिनेमाचा क्लायमॅक्स ट्विस्ट पाहून तुम्ही नक्की सरप्राईज व्हाल.
सुबोध भावेच्या अभिनयाचा आणखी एक पैलू अनुभवायचा असेल, भयभीत करणारा रहस्यमयी भयपट मराठीत पाहायचा असेल तर ‘भयभीत’ हा सिनेमा नक्की पाहा.