सिनेमा : ‘मन फकीरा’
दिग्दर्शक, लेखक : मृण्मयी देशपांडे
कलाकार : सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील, अंकित मोहन,
रेणुका दफ्तरदार
कालावधी : 2 तास 12 मिनिटे
रेटींग : 3.5 मून्स
ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीसोबत तुमचं लग्न नाही झालयं आणि ज्या व्यक्तीसोबत तुम्ही लग्न केलय त्या व्यक्तीसोबत असताना तुम्हाला ज्याच्यावर किंवा जिच्यावर तुमचं प्रेम आहे त्या व्यक्तिची आठवणं येणं.. ? हा गुंता जितका सोडवावा तितका माणूस न कळत गुरफटतो मात्र हा गुंता अलगदही सोडवता येतो हे 'मन फकीरा' या सिनेमात पाहायला मिळेल.महाविद्यालयात शिकत असताना अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने एक एकांकिका दिग्दर्शित केली होती. आणि त्या एकांकिकेसाठी मृण्मयीला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिकेचं बक्षिसही मिळालं होतं. आणि आता इतकी वर्षे अभिनेत्री म्हणून प्रवास करताना दिग्दर्शनाची वाट मृण्मयीने ‘मन फकीरा’च्या निमित्ताने पकडली आहे. मृण्मयीचा सिनेमा दिग्दर्शनाचा पहिलाच प्रयत्न असला मात्र हा प्रयत्न यशस्वी ठरलाय असं म्हणायला हरकत नाही.
सिनेमात सुव्रत जोशी, सायली संजीव, अंजली पाटील, अंकित मोहन, रेणुका दफ्तरदार ही स्टारकास्ट आहे. सिनेमा सुरुवातीलाच एक वेगळा ट्विस्ट घेऊन सुरु होतो. सिनेमातील भूषण (सुव्रत जोशी) आणि रिया (सायली संजीव) या दोघांच्या लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री असं काही घडतं ज्याने या सिनेमाची कथा पुढे जाते. सिनेमाच्या कथेतील माही (अंजली पाटील) आणि नचिकेत (अंकित मोहन) ही पात्रे नाव ट्विस्ट घेऊन येतात. सिनेमातील या चारही विविध व्यक्तिरेखांमध्ये झालेला नात्यांमधील गुंता नेमका काय आहे ? हा गुंता सुटतो का किंवा हा गुंता कोण सोडवतो हे या सिनेमात रंजक पद्धतिने मांडलय. सुव्रतच्या भूमिकेतील संवात संपूर्ण सिनेमात ह्युमर आणतात. सायली संजीवने साकारलेली कधी निरागस मात्र आपले मुद्दे सडेतोड मांडणारी रिया पाहायला छान वाटतं. लंडनमध्ये स्वतंत्रपणे राहणारी मराठी मुलगी माही डॅशिंग वाटते, माहीची भूमिका ही लक्षवेधी ठरते. आपल्या लुक्सने तरुणींना घायाळ करणाऱ्या बिझनेसमॅन नचिकेतच्या भूमिकेत अंकित मोहनचंही कास्टिंग योग्य वाटतय. सुव्रत जोशी आणि सायलीने त्यांच्या अभिनयाच्या जोरावर हा सिनेमा वर उचललाय. काही ठिकाणी विनोदी पंचमुळे सिनेमा आणखी मनोरंजनात्मक होत जातो. आईच्या विनोदी भूमिकेत महाराष्ट्रभर चर्चेत असलेली अभिनेत्री रेणुका दफ्तरदार याही सिनेमात आईच्या भूमिकेत कमाल करते.
लंडनमधील नयनरम्य दृश्ये सिनेमा पाहताना रिफ्रेश करतात. यासाठी छायांकनाचही विशेष कौतुक. परदेशात चित्रीकरण झाल्याने हा सिनेमा चकचकीत वाटतो. विविध वळणावर येणारी सिनेमातील गाणी आणि सिनेमाच्या पार्श्वसंगीताने सिनेमा आणखी खुललेला दिसतो. वैभव जोशी, क्षितिज पटवर्धन आणि तनिष्क नाबर यांनी लिहीलेली गाणी त्याला सिद्धार्थ महादेवन आणि सौमिल श्रींगापुरे यांचं संगीत असलेली गाणी ऐकायला आणि पाहायला छान वाटतात.
सिनेमाचा उत्तरार्ध थोडा रेगांळलेला वाटतो मात्र उत्तरार्धाने चांगला वेग धरल्याने सिनेमा पाहायला मजा येते. सिनेमाची मांडणी, लेखन आणि दिग्दर्शनाच्या बाबतीत हा सिनेमा यशस्वी ठरलाय. एकूणच हलकी फुलकी कॉमेडी, ट्विस्ट्स, रंजक कहाणी असलेला हा सिनेमा चांगलच मनोरंजन करतो.