कलाकार: सुबोध भावे, पूजा सावंत, सुशांत शेलार, माधव देवचके, मानसी कुलकर्णी, प्रीतम कांगणे , तन्वी परब आणि इतर
कथा- दिग्दर्शन: अमोल शेटगे
रेटींग : 3 मून्स
मराठी सिनेसृष्टीला स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा तसा नवीन नाहीत. आजवर क्रिकेटवर अनेक सिनेमे आपण पाहिले आहेत. खेळ, खेळाची जिद्द आणि जिंकण्याचं ध्येय अशा आशयाचे हे सिनेमे असतात. यावरच बेतलेला एक नवा कोरा विजेता हा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे आणि या सिनेमाचं विशेष म्हणजे बॉलिवूडचे शोमॅन द सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्स या बॅनरअंतर्गत याची निर्मिती करण्यात आली आहे. सनई चौघडे या सुपरहिट सिनेमानंतर तब्बल बऱ्याच वर्षांनी सुभाष घई मराठी सिनेमा घेऊन येत आहेत आणि तोसुध्दा मल्टिस्टारर.
कथानक
ही कथा आहे महाराष्ट्राला सुवर्ण पदकांचं स्वप्न दाखवणाऱ्या एका माईंड कोचची, म्हणजेच सौमिंत्र देशमुखची ( सुबोध भावे). महाराष्ट्र स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये त्याचे तब्बल सात वर्षांनी पुनरागमन होतं. त्यामागे त्याचा एक वाईट भूतकाळ दडला आहे. गोव्यात राहणा-या सौमित्रला अकादमीची डीन वर्षा कानविंदेच (मानसी कुलकर्णी) मुंबईत परत आणते. महाराष्ट्रला चॅम्पियनशीप हाच ध्यास उराशी घेऊन सौमित्र मुंबईत आला आहे. खेळू शकत नसला तरी महाराष्ट्राचे खेळाडू घडवायची आस आहे. पण सौमित्र यांच्या पुन्हा अकॅडमीतील प्रवेशाला हेड कोच भटकळ (सुशांत शेलार) आपला विरोध कायम ठेवतात.
अकॅडमीत आल्यावर सौमित्र सर्व चार्ज आपल्या हाती घेतात. नलिनी जगताप (पूजा सावंत), सुनंदा गुर्जर (प्रितम कागणे), सोनिया कर्णिक ( तन्वी परब), देवेंद्र जाधवकर ( देवेंद्र चौगुले) , जगदीश मोरे, (गौरीश शिपूरकर), तसंच राहूल थोरात (माधव देवचके) आणि कृतिका थोरात व दीप्ती धोत्रे या कलाकारांची म्हणजेच महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करणा-या खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचं आणि महाराष्ट्राला चॅम्पियनशिप मिळवून देण्यासाठीचा प्रवास सौमित्र सुरु करतात. यात त्यांना कोणत्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं, महाराष्ट्राला खेळांमध्ये सुवर्णपदक मिळतं का हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.
दिग्दर्शन आणि संगीत
महाराष्ट्राला राष्ट्रीय खेळांमध्ये चॅम्पियनशिप मिळवून देण्याचं स्वप्न यावर बेतलेला सिनेमाचा आशय. आणि त्याभोवती गुंफलेली प्रत्येक खेळाडूंची कहाणी, जिद्द, उमेद आणि संघर्ष ही भट्टी चांगली जमून आली आहे. पूर्वार्धात सिनेमाने चांगली पकड धरली आहे. पण प्रत्येक खेऴाडूसोबत जोडलेली भावनिक कथा हे पूर्वार्धात जरी हद्यस्पर्शी वाटत असलं तरी ते सारखं सारखं पाहणं थोडं रटाळ वाटतं. प्रत्येक खेळाडूसोबतचा भावनिक दुवा हेरुन त्याला लढण्यासाठी तयार करणं हे गमक माईंड कोचने हेरलं आहे. ईर्षा, जिद्द, कुरघोडी आणि विजय या सर्वांचच यात मिश्रण पाहायला मिळतंय.
संवांदाबद्दल बोलायचं झालं तर सिनेमा त्यातही उजवा ठरला आहे. ‘महाराष्ट्राची ताकद नाही उमेद कमी पडतेय’ असे संवाद प्रेरणादायी ठरतात . तर संगीताबद्दल बोलायचं झालं तर पार्श्वसंगीत आणि सिनेमाचं शिर्षकगीत सिनेमात जान ओततात, त्यामुळे प्रत्येक प्रसंग प्रेक्षक मनापासून पाहतो.
अभिनय
सिनेमात व्यक्तिरेखा साकारणाऱ्या प्रत्येकाने भूमिकेला पूरेपूर न्याय दिला आहे. महाराष्ट्राला राष्ट्रीय खेळांमध्ये स्थान पटकवून देण्यासाठी अपार कष्ट करून जीवाची बाजू लावणाऱ्या खेळाडूंची जिद्द अगदी खरी वाटते. नेहमीप्रमाणेच संपूर्ण सिनेमाभर सुबोध भावे नावाची जादू सुरू राहते. महत्त्वाचं म्हणजे नकारात्मक भूमिकेतून अभिनेता सुशांत शेलारने आपली छाप पाडलीय. तर मानसीसुध्दा रूबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ डीन म्हणून शोबून दिसतेय.
पूजा सावंत, प्रितम कांगणे, तन्वी परब, माधव देवचके यांच्यासोबतच नव्या फळीतील इतर कलाकारांनीसुध्दा भूमिका चोख बजावल्या आहेत. ज्येष्ठ अभिनेते सुहास पळशीकर ह्यांची भूमिकासुध्दा लक्षवेधी ठरते. एकूणच खेळाच्या मैदानावरचं टीम वर्क गड्यांनी अभिनयातून दाखवून दिलंय.
सिनेमा का पाहावा ?
तुम्ही जर स्पोर्ट्स फॅन असाल आणि तुम्हालाही तुमच्या खेळात काही करून दाखवण्याची जिद्द असेल तर हा सिनेमा तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. हा एक कम्प्लिट स्पोर्ट्स ड्रामा सिनेमा आहे. अजून एक तुम्ही सुबोध भावेचे खुप मोठे चाहते असाल तर त्याने पुन्हा एकदा या सिनेमातून आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.