#EkThiBegumReview : क्राईम थ्रिलर सूडकथेचा थरार आणि उत्तम कलाकारांची फळी 

By  
on  

एका वेबसिरीजच्या यशासाठी काय हवं ? तर एक उत्तम कथा आणि कथेतील भूमिकांना न्याय देणार कलाकार. असचं झालयं ‘एक थी बेगम’ या वेबसिरीजच्या बाबतीत. एम एक्स प्लेयरवरील ‘एक थी बेगम’ ही वेबसिरीज सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. आणि ही वेबसिरीज का पाहावी तर आम्ही सांगतोय याची कारणं..


सचिन दरेकर यांनी या वेबसिरीजचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. अभिनेत्री अनुजा साठे या वेबसिरीजमधील मुख्य पात्र साकारतेय. शिवाय अंकित मोहन, अभिजीत चव्हाण, संतोष जुवेकर, चिन्मय मांडलेकर, विजय निकम, राजेंद्र शिरसाटकर, रेशम, अद्वेत दादरकर, अमित राज हे मराठी कलाकार या वेबसिरीजमध्ये आहेत.

चक्क कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमला मारण्याचं नियोजन करणाऱ्या सपना दीदीची ही कथा वाटत असली तरी सत्य घटनेवर प्रेरीत असलेली कथा असा या वेबिसिरीजचा उल्लेख केलेला आहे. तब्बल 14 भागांची ही वेबसिरीज आहे. या वेबसिरीजमध्ये 1980चा काळ दाखवला आहे. दुबईत असलेल्या गुंड मकसूद भाईसाठी मुंबईत काम करणाऱ्यांमध्ये राजकीय, पोलिस आणि इतर गॅंगस्टरचा समावेश यात दाखवलाय. त्यातच गँगस्टर जहीर मात्र या सगळ्यांमध्ये वेगळा आहे. आपली पत्नि अशरफवर तो जिवापाड प्रेम करतो. मात्र याच जहीरचा काटा काढण्यासाठी मकसूद भाई कोणता डाव खेळतो आणि त्यात जहीरचा मृत्यू कसा होतो हे थरारक दाखवलय. मात्र आपल्या पतिच्या मृत्यूमुळे सूड घेण्यासाठी पत्नि अशरफ कशी सपना बनते हाच या वेबसिरीजचा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या सौंदर्याने पतिच्या मृत्यूच्या कटात सहभागी असलेल्या प्रत्येक व्यक्तिला ती कशी जाळ्यात अडकवते यात सूड भावना अभिनेत्री अनुजा साठेने उत्तमरित्या वठवली आहे. 


अभिनेता अंकित मोहनच्या जहीर या व्यक्तिरेखेचं काम काही भागांपुरतचं असलं तरी ते अंकितने ही भूमिका प्रभावी पद्धतिने साकारली आहे. अभिनेता संतोष जुवेकरने साकारलेला सवत्या हा देखील गँगस्टर गॅँगमधील एक गुंड आहे. सतत दारुच्या नशेत असलेला सवत्याही संतोषने उत्तमरित्या साकारलाय. अभिनेता अभिजीत चव्हाणची एका भ्रष्ट पोलिस अधिकारी तावडेची भूमिका आहे. अभिनेता विजय निकम यांनीही एक गँगस्टर साकारलाय. चिन्मय मांडलेकरने एक निष्ठावंतर पोलिस अधिकारी साकारलाय. अशरफशी भेट झाल्यानंतर या पोलिस अधिकाऱ्याच्या आयुष्यात काय बदल घडतं हा देखील वेबसिरीजमधील एक ट्विस्ट आहे. अभिनेता राजेंद्र शिरसाटकर यांनी साकारलेला गँगस्टर नानाचीही प्रभावी भूमिका आहे. अभिनेत्री रेशमने साकारलेली महिला पत्रकाराची भूमिकाही यात लक्षवेधी ठरतेय. गायक, संगीतकार अमितराज या वेबसिरीजमध्ये रघू नावाच्या गुंडाची भूमिका साकारतोय. अभिनेता म्हणून त्याचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. मात्र या छोट्याश्या भूमिकेतही तो गुंड वाटतो यात त्याच्या अभिनयाच यश आहे. शिवाय त्याने या वेबसिरीजसाठी म्युझिक कंपोजही केलय. या आणि इतर बऱ्याच उत्तम कलाकारांची फळी या वेबसिरीजमध्ये आहे. अभिनेत्री अनुजा साठेच्या अभिनयाचे विविध पैलु या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळतात. पति, सासू-सासरे यांना सांभाळणारी एक गृहिणी ते पतिच्या हत्येचा सूड घेणारी सपना या प्रवासात येणारे बदल अनुजाने उत्तमरित्या साकारले आहेत. त्यामुळे अशरफ आणि सपना बेगमच्या भूमिकेत ती परिपुर्ण वाटते.

14 भागांच्या या वेबसिरीजचा प्रत्येक भाग थरारक आणि रंजक ठरतो. एका सीननंतर दुसऱ्या सीनपर्यंतचा प्रवास उत्कंठावर्धक आहे. यासाठी लेखक-दिग्दर्शक सचिन दरेकर यांचं विशेष कौतुक. वेबसिरीजचा शेवट मात्र वेबसिरीजचं दुसरं सिझन येणार असल्याचं खुणावतोय. काही ठिकाणी सततचा शिवीगाळ तितकाच गरजेचा असला तरी तो काही ठिकाणी मात्र कानाला नकोसा वाटतो.  छायांकनाच्या बाबतीत आणखी काही प्रयोग करता आले असते असं जाणवतं. काही सीन उगाच लांबवल्याचही वाटतं. मात्र सध्याच्या लॉकडाउनमध्ये घरात बसून एक थरारक सूडकथा अनुभवायची असेल तर ही वेबसिरीज नक्की पाहा. 


 

Recommended

Loading...
Share