वेब सिरीजचं नाव - हंड्रेड
कलाकार: रिंकू राजगुरु, लारा दत्ता, करण वाही, सुधांशू पांडे, परमीत सेठी, रोहिणी हट्टंगडी, अरूण नलावडे, मकरंद देशपांडे, ह्रषिकेश जोशी, संदेश कुलकर्णी
दिग्दर्शक : रुचि नारायण
रेटिंग: 3.5 मून्स
डिजीटल प्लॅटफॉर्मवर सध्या विविध विषयांवर सिरीज येत आहेत. शिवाय उत्तम कथा आणि उत्तम कलाकारांची फळी डिजीटल प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळतात. यातच नुकतीच ‘हंड्रेड’ नावाची हिंदी वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे. या वेब सिरीजमध्ये ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरु आणि लारा दत्ता मुख्य भूमिकेत आहेत. या वेब सिरीजमधून रिंकू आणि लारा दत्ता या दोघांचं वेब डेब्यू आहे. रुचि नारायण यांनी वेब सिरीजचं दिग्दर्शन केलं आहे. तब्बल आठ भागांची ही वेब सिरीज आहे.
नेत्रा पाटील एक मिडल क्लास घरातली मुलगी जी साकारली आहे रिंकू राजगुरुने. आणि लारा दत्ताने साकारलेली सौम्या शुक्ला जी आहे धडाकेबाज सहाय्यक पोलिस आयुक्त. नेत्रा पाटीलला जेव्हा तिला झालेल्या एका आजाराविषयी आणि तिच्या आयुष्यात फक्त 100 दिवस शिल्लक आहेत याविषयी कळतं तेव्हा ती काय काय करते, यावेळी ए.सी.पी. सौम्या शुक्लाला ती कशी भेटते आणि या भेटीनंतर पुढे काय काय घडतं आणि काय बदलतं यावर ही वेब सिरीज आहे. नेत्राचं सिंगापुरला जायचं स्वप्न आहे. तिचं हे स्वप्न पूर्ण होतय का ? तिचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला कोण कोण मदत करत ? हे पाहणं मनोरंजनात्मक आहे.एक सामान्य मुलगी आणि महिला पोलिस अधिकारीची ही कमाल केमिस्ट्री पाहायला छान वाटतं.नेत्राचं आयुष्य बदलण्यासाठी सौम्या तिच्याकडून काय काय करवून घेते. हे सुरु असताना नेत्राला आणखी कोण कोण भेटत जातं हे पाहणं रंजक ठरतय. शिवाय करण वाही, सुधांशू पांडे, परमीत सेठी, रोहिणी हट्टंगडी, अरूण नलावडे, मकरंद देशपांडे, ह्रषिकेश जोशी, संदेश कुलकर्णी या कलाकारांच्याही प्रभावी भूमिका पाहायला मिळतात.
रिंकू राजगुरुने साकारलेली नेत्रा या वेब सिरीजमधून सरप्राईज करते. रिंकू राजगुरुचा यातील अभिनय चांगलाच इम्प्रेस करतोय. सहज सोप्या अभिनयाने तिने साकारलेली बिनधास्त नेत्राला पाहायला धमाल येते. या एकाच वेब सिरीजमध्ये रिंकूचा ड्रामा, डान्स, एक्शन, इमोशन्स, रोमान्स या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. विशेष म्हणजे लारा दत्ता सारख्या अनुभवी अभिनेत्रीसोबतही ती सहज वावरताना दिसते. असं असलं तरी काही ठिकाणी ‘सैराट’ आणि ‘मेकअप’ सिनेमातील बिनधास्त रिंकूही आठवते. ही वेब सिरीज हिंदी असली तरी रिंकूची महाराष्ट्रीयन मुलीची भूमिका असल्याने ती अधून मधून मराठी भाषेतही बोलते.लारा दत्ताचा हा वेब डेब्यू आणि कमबॅक जरी असला तरी लारा बऱ्याच वर्षांनी काम करत असल्याचं कुठेही जाणवत नाही. महिला पोलिस अधिकारीच्या भूमिकेत लारा उत्तम शिरली आहे. दिग्दर्शिका रुचि नारायण यांचं उत्तम दिग्दर्शन लाभल्याने रिंकूला त्यांनी उत्तम प्रेझेंट केलय. शिवाय रिंकू आणि लारा दत्ताची जबरदस्त केमिस्ट्री दाखवण्यामागेही रुचि यांची मेहनत दिसते.
काही ठिकाणी सीन उगाच लांबवल्याचं जाणवतं. पहिल्या भागापासून या वेब सिरीजने धरलेला वेग शेवटच्या दोन भागांमध्ये थोडा रटाळ वाटतो. बॅकग्राउंड म्युझिकच्या बाबतीत ही सिरीज कमकूवत वाटते. मात्र वेब सिरीजचं छायांकन उत्तम झालय. ही वेब सिरीज का पाहावी ? तर सध्याच्या लॉकडाउनच्या काळात मनोरंजन, एक्शन, कॉमेडी, ड्रामा या सगळ्या गोष्टी एकाच वेब सिरीजमध्ये अनुभवायच्या असतील तर ही वेब सिरीज नक्की पाहा.