‘अग्गबाई सासूबाई’ या मालिकेच्या जागी आता ‘अग्गबाई सूनबाई’ ही नवी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेत ‘शुभ्रा’ च्या भूमिकेत काहींसाठी परिचयाचा तर काहींसाठी नवखा वाटणारा उमा पेंढारकर हा चेहेरा दिसणार आहे. मुळात एक काऊंसिलर असलेल्या उमाचा अग्गबाई सूनबाई पर्यंतचा प्रवास प्रेरणादायी आहे.
या मालिकेविषयी उमा सांगते की, "जेव्हा झी मराठीकडून या मालिकेची ऑफर आली तेव्हा मलाही असाच प्रश्न पडला होता, तेजश्री खूप सिनियर आणि मोठी अभिनेत्री आहे, पण मी ह्या मालिकेत रिप्लेसमेंट म्हणून आलेली नाही, ह्या शुभ्राचं रूप तिच्यापेक्षा खूप वेगळं आहे. ही शुभ्रा थोडी बुजरी आहे, ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे. आम्हा दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने ती घरातच आहे, ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे, ही शुभ्रा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल यात शंकाच नाही."
खऱ्या आयुष्यात काउंसिलर ते अभिनेत्री असा उमाचा प्रवास आहे. डोंबिवलीकर उमानं ज्योती शिधये यांच्याकडून कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं. अद्वैत दादरकारचे आई-बाबा शुभदा आणि श्रीकांत दादरकर यांच्याकडे तिनं नाट्यसंगीताचा डिप्लोमा केला. त्यात ती पहिली आली. प्रशांत दामलेंकडून उमाला हा पुरस्कार मिळाला. आणि तोच क्षण उमाला रंगभूमीवर आणण्यासाठी पुरेसा ठरला. आणि तिला ‘संगीत संशय कल्लोळ’ हे नाटक मिळालं. याखेरीज सायकॉलॉजीमध्ये उमानं मास्टर्स केलं आहे. त्यामुळे ती काउंसिलिंगचं काम मोठया जबाबदारीनं करते.
.
या मालिकेत काम करण्याच्या अनुभवाविषयी उमा सांगते की, "तसं पाहिलं तर अग्गबाई सासूबाईचीच संपूर्ण टीम या मालिकेत आहे, केवळ मी आणि अद्वैत दादरकर वगळता इतर बरेचजण तेच आहेत. त्यामुळे त्यांची एक भट्टी जमली आहे. यात आपण सहभागी होऊ शकू का? असा प्रश्न सुरवातीला पडला होत, पण पहिल्या दिवसापासूनच सगळ्यांनी आपलेपणा दाखवला नवखेपण कुठे जाणवलंच नाही. निवेदिता ताई असोत गिरीश ओक असोत किंवा मोहन जोशी सर, हे सर्वजण इतके मोठे कलाकार आहेत आणि त्यांच्यासोबत काम करताना खूप मज्जा येत आहे. पहिल्यांदाच झी मराठीसारख्या ग्लॅमरस वाहिनीसोबत काम करण्याचा अनुभव घेत असल्याने मनात एक वेगळाच आनंद आहे."
तेव्हा या मालिकेतून उमा कशी प्रेक्षकांची मनं जिंकतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.