महाराष्ट्रवर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटामुळे दरवर्षी जल्लोषात साजरा करण्यात येणारा महाराष्ट्र दीन यंदा घरातच साजरा केला जातोय. मात्र काही मराठी मालिकांच्या सेटवर महाराष्ट्र दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. महाराष्ट्रात सध्या चित्रीकरणाला बंदी असल्याने मनोरंजनात खंड पडू नये म्हणून अनेक मालिकांचं चित्रीकरण आता महाराष्ट्राबाहेर करण्यात येतय. तेव्हा गोवा, सिल्वासा, गुजरात, बेळगाव यासारख्या ठिकाणी सध्या काही मालिकांचं चित्रीकरण सुरु आहे.
महाराष्ट्रापासून दूर राहून शूटींग करायला लागत असल्याने झी मराठी वाहिनीवरील मालिका कलाकारांनी सेटवर महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला आहे.
'माझा होशील ना' आणि 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकांचं चित्रीकरणही सध्या महाराष्ट्राबाहेर सुरु आहे. म्हणूनच महाराष्ट्र दिनानिमित्ताने या मालिकेच्या टीमने महाराष्ट्र दिन सेटवरच साजरा केला आहे. यावेळी या मालिकेतील कलाकार आणि तंत्रज्ञ पारंपारिक वेशभुषेत पाहायला मिळाले. याशिवाय खास मराठमोळ्या जेवणाची मेजवानीचं आयोजनही करण्यात आलं होतं. यावेळी छत्रपती शिवाज महाराजांच्या प्रतिमेची पूजा करण्यात आली. 1 मे हा कामगार दिन असल्याने सेटवर तंत्रज्ञांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुरुष मंडळींनी फेटे घालून तर महिला कलाकारांनी मराठमोठ्या साडी आणि नथ या वेशभुषेत महाराष्ट्र दिन साजरा केला.
सध्याच्या संकट काळात लोकांच्या मदतीसाठी माझा होशील ना, ओशन फिल्म कंपनी, कलाकार आणि तंत्रज्ञ मिळून त्यांच्या मानधनातून एक निधी उभा करणार आहेत. हा निधी महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र मुख्यमंत्री निधीला सुपूर्त करण्यात येईल.