मराठी टेलिव्हिजनच्या दुनियेत विविध विषयांवर, विविध जॉनरच्या मालिका पाहायला मिळत आहेत. यातच एका मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचं लक्ष वेधलय. ती मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा'. वर्णभेदाचा विषय घेऊन केलेली ही मालिका लोकप्रिय ठरलीय. मालिकेच्या कथेसोबतच मालिकेतील कलाकारांची उत्तम निवड मालिकेच्या यशाचं कारण म्हणता येईल. यातच या मालिकेतील मुख्य पात्र म्हणजे दीपा. अभिनेत्री रेश्मा शिंदे हे पात्र उत्तमरित्या साकारतेय. काळ्या रंगाचा मेकअप चढवून रेश्माने साकारलेल्या दीपा या पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केलय.
अभिनेत्री रेश्मा शिंदेने याआधीही बऱ्याच मालिका, चित्रपट आणि कार्यक्रमांमधून काम केलय. रेश्माच्या अभिनयविश्वातील करियरची सुरुवात झाली ती 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमातून. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील टॅलेंड शोधण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या मंचावर रेश्माने आपल्या अभिनयाच्या जोरावर परिक्षकांचीही मनं जिंकली होती.
'बंध प्रेमाचे' या मालिकेतून रेश्माने मालिका विश्वात पाऊल ठेवलं होतं. या मालिकेत रेश्मा सहाय्यक कलाकार होती. त्यानंतर रेश्माने एकामागोमाग एक विविध मालिकांमधून एक वेगळी ओळख निर्माण केली.
'विवाहबंधन' या मालिकेतून तिने खलनायिका साकारली. या भूमिकेत रेश्माने आपल्या अभिनयाचा कस लावला होता. त्यानंतर 'लगोरी' या मालिकेतही रेश्मा झळकली. एकापाठोपाठ एक अशा मालिका रेश्माला मिळत गेल्या.
त्यानंतर 'नांदा सौख्य भरे' या मालिकेत रेश्माने संपदा हे पात्र साकारलं. तर 'चाहुल' मालिकेत ती संभवीची भूमिका साकारताना दिसली. प्रत्येक मालिकेत एका वेगळ्या भूमिकेसह तिने आपलं अभिनयकौशल्य दाखवलं.
2019 मध्ये रेश्माला हिंदी मालिकेची संधी चालून आली. एका मोठ्या हिंदी वाहिनीवर महत्त्वाच्या भूमिकेत रेश्मा झळकली. 'केसरी नंदन' असं या मालिकेचं नाव असून रेश्मा या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत झळकली होती.
वेगळा पेहराव, वेगळी बोलीभाषा या सगळ्यात तिने स्वत:ला मिसळून घेतंल. बिजली झोरावर सिंहची भूमिका तिने साकारली होती. या मालिकेतून तिने सगळ्यांचं लक्ष वेधलं. याशिवाय 'जन्य', 'रंग हे प्रेमाचे रंगीले', 'देवा एक अतरंगी' या मराठी चित्रपटांमध्येही तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
आता दीपाच्या भूमिकेत दिसणाऱ्या रेश्माचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. 'रंग माझा वेगळा' या मालिकेतील भूमिकेसाठी तिच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे.