समाजात अशा काही व्यक्ति असतात ज्या चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करण्याच्या वृतीच्या असतात. काहींना त्या देवासमान वाटतात पण खरा चेहरा काही वेगळाच असतो. अशाच काही वृत्तीविषयी भाष्य करणारी मालिका आहे ‘देवमाणूस’. अल्पावधीतच हा वेगळा विषय प्रेक्षकांना आवडला आणि ही मालिका लोकप्रिय झाली. या मालिकेतील सरू आज्जी , डिम्पल, टोण्या, बज्या, विजय, नाम्या ही आणि अशी अनेक पात्र प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतायत. सध्या चर्चेचा विषय असलेल्या या मालिकेत विविध वळण पाहायला मिळत आहेत
आता ही मालिका एका निर्णायक आणि रंजक टप्प्यावर आली आहे. देवी सिंग ला शोधण्यासाठी एसीपी दिव्या साम दाम दंड भेद ही सगळी अस्त्र वापरतेय, दिव्या हुशारीने अजितचे फिंगरप्रिंट्स मिळवते.
रेश्माच्या घरातल्या तिसऱ्या व्यक्तीच्या फिंगरप्रिंटसोबत अजितचे फिंगरप्रिंट मॅच होतात त्यामुळे दिव्या द्विधा मनस्थितीत आहे. पण आता दिव्याला प्रत्येक केसमध्ये असलेल्या व्यक्ती कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या प्रकारे अजितच्या संपर्कात आल्याचं लक्षात येतं.त्यामुळे आता एसीपी दिव्या डॉ. अजित कुमार देव उर्फ देवी सिंग ला कधी अटक करणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.