'देवमाणूस' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. एकीकडे देवीसिंग आता कारागृहात जेरबंद आहे. यातच त्याच्या डोक्यात विविध कल्पना सुचत आहेत. मालिकेत एका नव्या पात्राचीही नुकतीच एन्ट्री झाली आहे. देवीसिंगसोबतच या नव्या पात्राने प्रेक्षकांचंही लक्ष वेधून घेतलय. वकील आर्या देशमुखची या मालिकेत एन्ट्री झाली आहे. अभिनेत्री सोनाली पाटील ही व्यक्तिरेखा साकारतेय.
सोनालीचं सेटवर आगमन होताच तिने या मालिकेच्या सेटवर हसतं खेळतं वातावरण निर्माण केल्याचं चित्र पाहायला मिळतय. सोशल मिडीयावर सोनाली ही तिच्या विविध व्हिडीओसाठी कायम चर्चेत असते. कधी डान्स व्हिडीओ तर कधी एक्सप्रेशनची जुगलबंदी पाहायला मिळते. असाच काहीसा व्हिडीओ सोनालीने देवमाणूसच्या सेटवर केलाय.
यावेळी चक्क या व्हिडीओत सोनालीच नाही तर देवमाणूसही पाहायला मिळतोय. देवीसिंग, अजीतकुमार देव उर्फ अभिनेता किरण गायकवाड या व्हिडीओत चक्क डान्स करताना दिसत आहे. सोनालीसोबत किरण गायकवाडनेही ठेका धरला आहे. सोशल मिडीयावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पसंत केला जातोय.
मात्र आता आर्या देशमुखच्या येण्याने मालिकेत काय नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.