कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले होते. लॉकडाऊनमुळे अनेक गोष्टींवर निर्बंध ठेवण्यात आले होते. यात मनोरंजन विश्वातील चित्रीकरणावरही बंदी होती. त्यामुळे अनेक मालिकांचे चित्रीकरण हे महाराष्ट्राबाहेर सुरु करण्यात आले. या मालिकांमधील कलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण टीम ही कुटुंबापासून लांब राहुन बरेच दिवस महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करतेय. मात्र आता महाराष्ट्रात पाच टप्प्यात अनलॉक होत असताना राज्यात चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे.
आता काही मालिकांची टीम मुंबईत दाखल होताना दिसत आहेत. रंग माझा वेगळा या मालिकेचं चित्रीकरण हे गोव्यात सुरु होतं. त्यानंतर गोव्यातही चित्रीकरणावर बंदी आल्याने तिथून दुसऱ्या ठिकाणी हे चित्रीकरण करण्यात आलं. असे 54 दिवस या मालिकेच्या टीमने महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण केलं. ज्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेचे नवे भाग पाहायला मिळाले. सुरुवातीला या मालिकेचे काही जुने भाग प्रसारित होत होते. मात्र चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर सुरु होताच प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड न पडता या मालिकेचे नवे भाग प्रसारित करण्यात आले.
या मालिकेची टीमही नुकतीच मुंबईत दाखल झाली आहे. या मालिकेती कलाकारांनी सोशल मिडीयावर मुंबईत दाखल झाल्यानंतर विमानतळावरील फोटो शेयर केला आहे. तेव्हा आता पुन्हा मुंबईत या मालिकेचे चित्रीकरण सुरु होणार आहे. पुन्हा त्याच जोमाने हे कलाकार आणि टीम चित्रीकरणासाठी सज्ज असल्याचं पाहायला मिळतय.
'रंग माझा वेगळा' या मालिकेला सध्या वेगळं वळण मिळालय. या मालिकेत पुढे काय ट्विस्ट असेल हे पुढील भागांमधून समोर येईलच.