मराठी टेलिव्हिजन विश्वात कायम विविध विषयांवर मालिका पाहायला मिळाल्या आहेत. यंदाही विविध मालिकांच्या गर्दीत काही मालिका या लक्षवेधी ठरत आहेत. यापैकीच एक मालिका आहे 'सुंदरा मनामध्ये भरली'. मालिकेचा वेगळा विषय असल्याने ही मालिका कमी कालावधीतच लोकप्रिय ठरली आहे. सुरुवातीपासूनच या प्रेक्षकांनी या मालिकेला पसंत केलं. लतिका आणि अभिमन्यूची जोडीही लोकप्रिय ठरतेय. या मालिकेने नुकतेच 250 भाग पूर्ण केले आहेत.
मालिकेने 250 भाग पूर्ण केल्याच्या निमित्ताने मालिकेतील लतिका आणि अभिमन्यू साकारणारे कलाकार अक्षया नाईक आणि समीर परांजपे यांनी प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. कलर्स मराठी वाहिनीच्या सोशल मिडीया अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आलाय.
यावेळी लतिका म्हणून लोकप्रिय ठरलेली अक्षया म्हणते की, "आम्हाला खूप छान वाटतय आम्ही खूप खुश आहोत. आपल्या मालिकेचे 250 एपिसोड पूर्ण होतायतही गोड बातमी आम्हाला तुमच्यासोबत शेयर करायची आहे."
तर अभिमन्यू म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता समीर परांजपे म्हणतो, "250 भागांचा टप्पा तुमच्या प्रेमामुळे आणि आशिर्वादाने पूर्ण होतोय. यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतोय. जे प्रेम आम्हाला देत आलात, मालिकेच्या पात्रांना देत आलात तसच प्रेम आणि आशिर्वाद आमच्यासोबत कायम ठेवा. असे अनेक टप्पे आम्हाला तुमच्यासोबत पूर्ण करायला आवडेल."
असं म्हणत या कलाकारांनी मायबाप प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. तेव्हा 250 भाग पूर्ण केल्यानंतर या मालिकेत आता पुढे काय काय पाहायला मिळले हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.