विनोदाचा बापमाणूस जॉनी लिव्हर यांनी 'हास्यजत्रा'च्या कलाकारांसाठी केली ही खास गोष्ट

By  
on  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर अनेक पाहुणे मंडळी येत असतात. या कार्यक्रमातील कलाकार प्रेक्षकांना तर खळखळून हसवतातच शिवाय आलेली पाहुणे मंडळीही या कार्यक्रमाच्या प्रेमात पडतात. नुकतच या कार्यक्रमात कॉमेडी किंग जॉनी लिव्हर यांनी हजेरी लावली होती. यावेळी या मंचावर एकच कल्ला पाहायला मिळाला. जॉनी यांनी मंचावरील परफॉर्मन्सची चांगलीच मजा लुटली. 

मात्र कलाकारांचा आदन सन्मान करणारे जॉनी यांनी हास्यजत्रामधील कलाकारांसाठी खास गिफ्ट्सही आणले होते. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात लॉली म्हणून प्रसिद्ध असणारी अभिनेत्री नम्रता संभेरावने सोशल मिडीयावर पोस्ट करुन जॉनी लिव्हर यांचे आभार मानले आहेत. 

नम्रता या पोस्टमध्ये लिहीते की, "जेव्हा विनोदाचा बापमाणुस जॉनी लिव्हर जी तुमचं काम बघून सरप्राईज गिफ्ट्स घेऊन येतात, आयुष्यातला अविस्मरणीय क्षण. आपण प्रामाणिक पणे काम करत असतो धडपडत असतो, शून्यापासून सुरुवात केली अगदी ज्युनिअर आर्टिस्ट पासून पासिंगच्या रोलपासून ते आज सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्यजत्रा पर्यंत प्रवास चालू आहे आणि चालूच राहील, पण जेव्हा त्यात आशिर्वादाची भर पडते तेव्हा अजून हुरूप येतो उत्साह वाढतो, प्रेक्षकांचं प्रेम तर आहेच पण जेव्हा आपल्या क्षेत्रातल्या नामवंत कलावंताचा फोन येतो त्यात विनोदाच्या बाप माणसाचा फोन येतो आणि ते आपल्या कामाचं भरभरून कौतुक करतात, तेव्हा आनंदाला पारावार उरत नाही, तो ओसंडून वाहतच राहतो, असंही कधी घडू शकतं ह्याची कल्पनाच केली नव्हती कधी, सगळं स्वप्नवत, बस कौतुक आणि प्रेम ह्या व्यतिरिक्त काय हवं असतं एका कलाकाराला. धन्यवाद जॉनी लिव्हर"

अभिनेत्री नम्रता ही या कार्यक्रमात विविध व्यक्तिरेखा मंचावर सादर करते. यापैकी तिचं लॉली हे पात्र मोठ्या प्रमाणात पसंत केलं जातं. एक मेहनती आणि गुणी कलाकार म्हणून ओळख असलेल्या नम्रतासाठी जॉनी यांच्याकडून मिळालेली कौतुकाची थाप खास ठरलीय एवढं नक्की.

जॉनी लिव्हर हे या कार्यक्रमाचे मोठे चाहते आहेत. पाहुणे म्हणून या कार्यक्रमाच्या मंचावर आल्यावर त्यांनी या कार्यक्रमातील विनोदवीरांचं कौतुकही केलय. 

Recommended

Loading...
Share