‘मन झालं बाजिंद’ ही नवी मालिका लवकरच प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. काही दिवसांपूर्वी या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आणि या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधलंय. या मालिकेत राया आणि कृष्णाची एक अनोखी प्रेम कहाणी दाखवण्यात येणार आहे. मात्र मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच प्रेक्षक बुचकळ्यात पडले आहेत. अनेकांना मालिकेच्या नावातील 'बाजिंद' या शब्दाचा अर्थ मात्र माहिती नाहीये. त्यामुळे महाराष्ट्रभर गुगलवर ‘बाजिंद’ या शब्दाचा अर्थ शोधला जात आहे.
बाजिंद म्हणजे काय हे गुगलवर मोठ्या प्रमाणात शोधण्यात आले असून ते गुगलच्या आकडेवारीवरुन स्पष्ट झालय. 29 जुलै रोजी प्रदर्शित करण्यात आलेला या मालिकेचा प्रोमो सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आला. मात्र हा प्रोमो पाहुन या मालिकेच्या नावातील बाजिंद शब्दाचा अर्थ शोधण्यात प्रेक्षक गुगं झाले. ‘बाजिंद अर्थ’, ‘बाजिंद Meaning’, ‘बाजिंदचा अर्थ’, ‘बाजिंद म्हणजे काय?’, 'बाजिंदी अर्थ' या टर्म्स गुगल सर्चच्या ट्रेण्डमध्ये दिसून येत आहेत.
सायंकाळी म्हणजेच जेव्हा सर्वजण टीव्हीसमोर बसून आपल्या आवडत्या मालिका पाहत असतात तेव्हापासून ‘बाजिंद’ शब्दाबद्दलचा सर्च वाढताना दिसतो. सामान्यपणे पुढील चार तासांमध्ये म्हणजेच रात्री साडेअकरापर्यंत सर्चचे हे प्रमाण वाढतच जाते. साडेअकराला सर्वाधिक लोक ‘बाजिंद’बद्दल सर्च करत असतात. विशेष म्हणजे त्यानंतर ‘बाजिंद’बद्दलच्या सर्चमध्ये पुन्हा घट होते आणि पुन्हा पुढील दिवशी साडेसातच्या आत हा सर्च ग्राफ वर गेलेला पहायला मिळतो. म्हणजेच जेव्हा जेव्हा मालिका बघताना जाहिरात लागते तेव्हा लोक ‘बाजिंद’चा अर्थ काय आहे हे गुगलवर सर्च करताना दिसतात.
‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत बाजिंद हा शब्द मालिकेतील नायक रायासाठी वापरण्यात आला आहे. या शब्दाचा अर्थ इथे जिद्दी असा होतो. मालिकेत राया हा अतिशय जिद्दी दाखवण्यात येणार आहे. परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा बाजिंद नायक राया आहे. तर मालिकेतील नायिका कृष्णा ही मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी दाखवण्यात येणार आहे.या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत. या मालिकेचे दिग्दर्शन अनिकेत साने यांनी केलेले असून वाघोबा प्रॉडक्शन यांनी या मालिकेच्या निर्मीतीची धुरा सांभाळली आहे.