By  
on  

या कारणामुळे 'होम मिनिस्टर'ची संपूर्ण टीम झाली भावुक, सेटवर या व्यक्तिने लावली हजेरी

 2004 साली सुरु झालेला 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाचा प्रवास गेल्या 17 वर्षांपासून अविरत सुरु आहे. दार उघड वहिनी दार उघड म्हणत आदेश भावोजी घरा घरात जाऊन हा त्या घरातील होम मिनिस्टरसोबत धमाल गप्पा आणि खेळ खेळतात. ज्याचा आनंद प्रेक्षकांसह सहभागी झालेल्या गृहीणी आणि त्यांचा परिवारही घेतात. 

नुकतच या कार्यक्रमाचा गोकुळाष्टमी विशेष भाग चित्रीत करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाची धुरा सांभाळण्यासाठी एक मुलगी तिथे हजर होती. हे पाहुन संपूर्ण होम मिनिस्टरची टीम भावुक झाली. या कार्यक्रमाच्या प्रवासात अगदी सुरुवातीपासून साथ देणारे कॅमेरामन शशी गायकवाड यांचं 2017 मध्ये निधन झालं. त्यानंतर त्यांची उणीव कायम या कार्यक्रमाच्या टीमला भासली. यात त्यांची लेक सेटवर येताच सगळ्यांसाठी हा क्षण भावुक होता. शशी यांच्याजागी त्यांची लेक भाग्यश्री यावेळी सेटवर कॅमेऱा हाताळत होती. 

याविषयी बोलताना या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक आदेश बांदेकर म्हणाले की, "शशी आमच्यात नाही हा आमच्यासाठी एक धक्काच होता, शूटिंग सुरु झालं की शशी समोर दिसायचा. आपल्या घाटकोपरच्या छोट्याश्या घरात कुटुंबासमवेत राहत असताना त्यांनी खूप अडचणींचा सामना केला. परिस्थिती बेताची असताना देखील ते आपल्या कुटुंबासमवेत खुश असायचे. त्यांच्या मागे त्यांची मुलगी भाग्यश्री हीने देखील ह्याच क्षेत्रात यायचं ठरवलं आणि कॅमेरा मागे काम करताना तिने एक शॉर्टफिल्म पण शूट केलीय. आज तिला होम मिनिस्टरचा कॅमेरा हाताळताना पाहून खूप भरून येतंय आणि आनंदही होतोय."

बाबांच्या आठवणींना उजाळा देत भाग्यश्री शशी म्हणते की, "माझे बाबा 'होम मिनिस्टर'मध्ये कॅमेरामन आहेत कट टू मी 'होम मिनिस्टरमध्ये कॅमेरामन आहे.. हा प्रवास माझ्यासाठी फार वेगळा होता. वडील काम करत होते म्हणून तुलाही काम मिळालं असेल.. असं आजूबाजूचे बरेच लोक बोलताना दिसू लागले आहेत. घरातला एकमेव फिल्म इंडस्ट्रीत काम करणारा माणूस म्हणजे माझे बाबा. 'झी' बाबतीत बाबा किती लॉयल होते हे मी लहानपणापासून पाहिलं आहे. हा वारसा आपण पुढे चालवायचा हे खूप आधीच ठरवून ठेवलेलं. या कामाच्या बाबतीत तसं फक्त ऐकून होते. बाबा होम मिनिस्टरसाठी काम करत होते तेव्हा ते घरी आल्यावर वेगवेगळे बरेच किस्से ऐकवायचे. त्यांचं आम्ही जसं एक कुटुंब होतं, तसंच अजून एक जवळचं कुटुंब म्हणजे होम मिनिस्टर. अचानक तीन वर्षांपूर्वी बाबा गेले. पुढे काय करायचं? आपण पाहिलेलं स्वप्नं पूर्ण होईल का? आणि ते पूर्ण करायचं असेल तर किती परीक्षा द्याव्या लागणार? अनेक प्रश्न मनात होते. नंतर एल.एस. रहेजा स्कुल ऑफ आर्टस्मधून मी माझं डिजिटल फिल्ममेकिंगचं शिक्षण पूर्ण केलं. शॉर्ट फिल्म केल्या, मेहेनत करण्याची पूर्ण तयारी होती. शिक्षण पूर्ण झालं खरं पण कामाची बोंब कायम होती. त्यात कोरोनामुळे सगळं ठप्प झालेलं. अचानक काही दिवसांपूर्वी आदेश काकांचा फोन आला.. अचानक आलेल्या एका फोनमुळे माझं अख्खं जग बदललं. खरं तर होम मिनिस्टर ही टीम तर आहेच पण त्यापेक्षा जास्त एक 'कुटुंब' आहे. बाबा गेल्यानंतर पुन्हा या कुटुंबासोबत हसत खेळत राहू की नाही हा प्रश्न पडायचा. या कुटुंबाने मला पुन्हा त्यांच्यात सामावून घेतले, आणि अखेर मी इथे कॅमेरामन म्हणून मी रुजू झाले.. या संधीबद्दल मी सगळ्यांची खूप आभारी आहे."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive