छोट्या पडद्यावर टीआरपीचा खेळ रंगतो. करोना-लॉकडाऊन काळात थिएटर्समध्ये सिनेमे पाहाण्याची, किंवा नाटकांच्या प्रयोगाला जाण्याची काहीच सोय नसल्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबतच छोट्या पडद्यानेसुध्दा कंबर कसलीय. नवनवीन कथा प्रेक्षकांसमोर मांडण्यासाठी सतत चढाओढ सुरुय. त्यामुळेच टीआरपीच्या रेसमध्ये जो तारला जातोय तोच टिकतोय नाहीतर बाकीच्या मालिकांना आपला गाशा गुंडाळावा लागतोय.
सध्या टीआरपीच्या स्पर्धेत स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका बाजी मारत आहेत. नुकतीच प्रेक्षकांना सर्वाधिक आवडणाऱ्या मालिकांची यादी जाहीर झाली आहे. यात 'आई कुठे काय करते' मालिकेसह आणखी चार मालिकांचा समावेश आहे.
आई कुठे काय करते
नवनवीन ट्विस्ट, लोकप्रिय कलाकार, त्यांनी साकारलेल्या चोख व्यक्तिरेखा आणि एक कौटुंबिक मालिका यामुळ ेआई कुठे काय करते मालिका ही गेले वर्षभर प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय. या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी होताना दिसत नाही. यामुळे या मालिकेला सर्वाधिक लोकप्रिय मालिकेच्या यादीत अव्वल स्थान मिळालं आहे.
फुलाला सुगंध मातीचा
सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवलीय. शिक्षणाला प्रचंड महत्त्व असणा-या घरातून आलेली किर्ती जेव्हा जामखेडकर यांच्या घरी सून म्हणून येते.तेव्हा तिला इथे शिक्षणाला काहीच किंमत नाही हे लक्षात येतं. प्रत्येक परिस्थितीत नवऱ्याला साथ देणारी, नव्याची कास धरणारी कीर्ती आणि जुन्या विचारांची जीजी आक्का यांमधील संघर्ष प्रेक्षकांना पसंत पडत आहे.
देवमाणूस
देवमाणूस मालिकेने रसिक प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी टीआरपीच्या खेळात ही मालिका तिस-या स्थानावर होती. मालिकेच्या कथानकाने आणि कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं होतं. मालिकेच्या महाएपिसोडला मिळालेल्या प्रतिसादामुळे ह्या मालिकेने तिसरं स्थान पटकावलं.
सुखं म्हणजे नक्की काय असतं
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुखं म्हणजे नक्की काय असतं' ही मालिकादेखील दिवसेंदिवस प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. जयदीप आणि गौरी यांच्यात हळूवार फुलणाऱ्या प्रेमाचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सोबतच शिर्के-पाटलांच्या घरात विविध कुरापती करुन सतत विघ्न आणणा-या शालिनीवहिनींचासुध्दा एक वेगळाच रुबाब आहे.
रंग माझा वेगळा
सावळ्या रंगाबद्दलची समाजाची मानसिकता बदलणारी स्टार प्रवाहची मालिका 'रंग माझा वेगळा' प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांच्या यादीत पाचव्या स्थानावर आहे. दिपा आणि कार्तिक यांच्या नात्यात आलेला दुरावा आणि त्यांच्या मुलींचा जन्म यामुळे मालिकेत आलेल्या ट्विस्टमुळे मालिकेची लोकप्रियता पुन्हा वाढलीय.