'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून राणादा या नावानं महाराष्ट्राभर लोकप्रिय ठरलेला अभिनेता हार्दिक जोशी आता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यंदा वेगळा लुक आणि हटके भूमिकेतून हार्दिक प्रेक्षकांची मनं जिंकणार आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेून एका वेगळ्या भूमिकेत झळकणारेय.
या भूमिकेविषयी तो सांगतो की, "ही भूमिका खूपच वेगळी आहे. मी साकारत असलेला सिद्धार्थ हा एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये वाढलेला आहे. कुटुंबिय पारंपरिक असल्यामुळे घरचं वातावरण देखील पारंपरिक आहे. सिद्धार्थ हा खूप प्रॅक्टिकल मुलगा आहे आणि त्याला स्वत:ला पायावर उभं रहायचं आहे. मला जेव्हा या भूमिकेसाठी विचारण्यात आलं तेव्हा मी नाही बोलूच शकलो नाही. झी हे माझं कुटुंब आहे त्यामुळे त्यांना नाही बोलणं माझ्यासाठी शक्यच नाही कारण या वाहिनीने मला याआधी देखील एक वेगळी ओळख दिली. तसेच राणामुळे माझी तयार झालेली इमेज हि खूप वेगळी आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळ्या भूमिकेसाठी मला विचारण्यात आलं त्यामुळे मी लगेचच होकार दिला."
राणादा म्हणून लोकप्रिय ठरलेला आणि ती ओळख असताना या वेगळ्या भूमिकेचा अनुभवही त्याने सांगितलाय. तो म्हणतो की, "थोडंसं दडपण आहे. अजूनही प्रेक्षक मला राणा म्हणून ओळखतात आणि त्याच नावाने हाक मारतात. त्यामुळे सिद्धार्थ म्हणून देखील माझी ओळख व्हावी यासाठी मी प्रयत्न करतोय. त्यासाठी भूमिकेची देहबोली, दिसणं, बोलणं यासगळ्याकडे मी खूप लक्ष देतोय. राणा हा खूप इमोशनल होता त्याउलट सिद्धार्थ हा खूप प्रॅक्टिकल आहे त्यामुळे विरुद्ध टोकाची भूमिका निभावताना मी माझे १०० टक्के देतो आहे. प्रेक्षक देखील राणा सारखंच सिद्धार्थवर पण प्रेम करतील याची मला खात्री आहे."
राणादा या भूमिकेमुळे हार्दिक जोशीचा मोठा चाहतावर्ग तयार झालाय. या चाहत्यांनाही त्याच्या नव्या भूमिकेविषयी उत्सुकता असल्याचं तो सांगतो. "या प्रोमोज मधून प्रेक्षकांनी मला वेगळ्या लुक मध्ये पाहिलं आहे त्यामुळे ते खूप उत्सुक आहेत मला या फ्रेश लुक मध्ये पाहायला. तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर आता राणा या व्यक्तिरेखेतून बाहेर येऊन मी काहीतरी नवीन प्रेक्षकांसाठी सादर करणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना मालिकेबद्दल खूप आतुरता आहे."
या मालिकेतील एकत्र कुटुंबपद्धतीविषयी बोलताना तो म्हणतो की, "मला एकत्र कुटुंबपद्धती आवडते कारण घर भरलेलं असतं. घरात सणासुदीचं वातावरण असतं. सगळे एकत्र असले कि ती धमाल मस्ती असते त्यामुळे मला एकत्र कुटुंबपद्धती खूप आवडते."
या नव्या मालिकेच्या चित्रीकरणाला हार्दिकने सुरुवात केलीय. हार्दिकसह अभिनेत्री अमृता पवार त्याच्या पत्निच्या भूमिकेत झळकतेय. शिवाय इतरही उत्तम कलाकारमंडळी या मालिकेला लाभली आहे. या कलाकारांसोबत हार्दिकची गट्टी जमल्याचं तो सांगतो.