'रात्रीस खेळ चाले' आणि 'गाव गाता गजाली' या मालिकांमुळे प्रेक्षकांना कोकणच्या सौंदर्याने अधिक भुरळ घातली आणि हे कोकण ज्यांचा नजरेने टिपलं ते कॅमेरामन गणेश कोकरे. सातत्याने वेगवेगळे प्रयोग करत सेट वर हसत खेळत अनेक दृश्य टिपणाऱ्या गणेश कोकरे यांनी कोकणातल्या गणेशोत्सवाचं चित्रीकरण करताना असाच एक आगळा वेगळा प्रयोग केला.
कोकणातली परंपरा असणाऱ्या फुगड्या चित्रित करताना छाया चित्रकार गणेश कोकरे ह्यांनी एका हातात कॅमेरा आणि तर दुसऱ्या हाताने कलाकारांसोबत फुगडी घालून चित्रीकरण केलं. ज्यामुळे उत्तम चित्रीकरण झालच शिवाय एक वेगळा अनुभव, वेगळा आनंद सगळ्यानाच मिळाला आणि हा आनंद प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे 'रात्रीस खेळ चाले 3' च्या गणपती विशेष भागात.
कोकणातील गणेशोत्सव हा एक वेगळा अनुभव असतो त्यामुळे कोकणात जसा पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा होतो त्याचा अनुभव प्रेक्षक या मालिकेतून अनुभवू शकतात. या विशेष भागांमध्ये भजन देखील प्रेक्षक पाहू शकतील. त्यामुळे येत्या आठवड्यात हे विशेष भाग झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहेत.