By  
on  

"टेलिव्हिजन या माध्यमात काम करण्याचा अनुभव वेगळा" तानाजीने सांगितला मालिकेत काम करण्याचा अनुभव

 सैराट या लोकप्रिय चित्रपटातील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. आजही ही पात्रं साकारणाऱ्या कलाकारांची सैराट या सिनेमानं ओळख आहे. मात्र ते कलाकार आपली एक वेगळी ओळख बनवू पाहत आहेत. यापैकीच एक आहे अभिनेता तानाजी गालगुंडे. सैराटमध्ये लंगड्या म्हणजेच बाळ्याची भूमिका साकारल्यानंतर तानाजीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. सध्या मन झालं बाजींद या मालिकेत तो झळकतोय. या मालिकेत तो मुंज्याची व्यक्तिरेखा साकारतोय.

या मालिकेच्या निमित्ताने तानाजी हा पहिल्यांदाच टेलिव्हिजन या माध्यमात काम करतोय आणि त्याबद्दलचा अनुभव शेअर करताना तानाजी सांगतो की, "टेलिव्हिजन या माध्यमात काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा आहे. हे माध्यम मुळातच खूप फास्ट आहे. या माध्यमातून आपण खूप कमी वेळात जास्त लोकांपर्यंत पोहोचतो. तसंच या माध्यमात काम पण खूप वेगवान असतं ते मला अंगवळणी पडताना थोडं कठीण जातंय पण मालिकेची टीम खूपच सपोर्टिव्ह आहे त्यामुळे ते मला सांभाळून घेतात. चित्रपटात काम करताना आपल्याकडे खूप वेळ असतो. महिनाभर आधी स्क्रिप्ट मिळते मग त्यावर चर्चा होते पण टेलिव्हिजन मध्ये तसं नसतं. इथे स्क्रिप्ट हातात आली कि लगेच सिन करायचा असतो. पण इथे सगळे मला सांभाळून घेत आहेत."

प्रेक्षकांना तानाजीची मुंज्या ही व्यक्तिरेखा खूप आवडतेय. या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना तानाजी सांगतोयकी, "मुंज्या या माझ्या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मला मिळतोय. मुंज्याला पाहताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. मुंज्याच्या कॅरेक्टरमध्ये असणारा निरागसपणा, त्याचा होणारा गोंधळ आणि त्याच्या रिऍक्शन्स पाहायला प्रेक्षकांना खूप आवडतंय."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive