छोट्यांचा खास गायनाचा कार्यक्रम 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक सचिन पिळगांवकर, गायक आदर्श शिंदे आणि गायिका वैशाली सामंत यांनी खास प्रोमो शूट केलाय. या प्रोमोसाठी या कलाकारांनी शाळेचा गणवेश परिधान केला. याच निमित्ताने या कलाकारांनी शाळेच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिलाय.
या कार्यक्रमाच्या प्रोमोजसाठी या तिघांनीही शाळेचा गणवेश परिधान केला. भविष्यात जर सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांच्यासारखी उंच भरारी घ्यायची असेल तर 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद'चा मंच तुम्हाला खुणावतोय अशी हटके थीम या प्रोमोसाठी वापरण्यात आली आहे. सचिन पिळगावकर, वैशाली सामंत, आदर्श शिंदे यांना आजवर आपण वेगवेगळया रुपात भेटलो आहोत. मात्र अश्या रुपात पहाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या भन्नाट प्रोमोशूट विषयी सांगताना वैशाली सामंत म्हणाल्या, "हा प्रोमोशूट करताना प्रचंड दडपण होतं. दोन वेण्या आणि शाळेच्या गणवेशामध्ये मला प्रेक्षक स्वीकारतील का याची भीती होती. पण प्रोमोला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद होतोय. हा प्रोमो शूट करताना मी माझ्या शाळेच्या बाकावर बसलीय असंच वाटत होतं. शिवाय या शूटच्या निमित्ताने छोट्या दोस्तांना भेटून फार बरं वाटलं. आताची पीढी ही टेक्नोसॅव्ही आहे. त्यांच्या वयाला साजेसं त्यांना ग्रुम करणं, त्यांच्यातलं बेस्ट शोधून काढणं याची जबाबदारी माझ्यावर आहे."
यानिमित्ताने सचिन पिळगावकर यांनी खास आठवण सांगितली, "14 नोव्हेंबर अर्थातच चाचा नेहरुंची जयंती आपण बालदिन म्हणून साजरी करतो. या दिवसाची माझी खास आठवण म्हणजे मला प्रत्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरुंची भेट घेऊन त्यांचा आशिर्वाद घेता आला. हा दिवस माझ्या कायम स्मरणात राहिल."
तर आदर्श शिंदे म्हणाला की, "या प्रोमोसाठी मी जेव्हा गणवेश घातला तेव्हा मी शाळेच्या दिवसांमध्येच हरवून गेलो. शाळेत असताना मी माझ्या मित्रांसोबत खूप धमालमस्ती करायचो. आमच्या टीचर्सही मला गाणं म्हणायला सांगायच्या. ते सगळे दिवस मला आठवले. प्रोमोची कल्पनाच खूप जबरदस्त आहे. प्रेक्षकांना हा कार्यक्रम नक्की आवडेल याची मला खात्री आहे." येत्या 4 डिसेंबरपासून हा कार्यक्रम स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.