नुकत्याच सुरु झालेल्या 'इंडियन आयडल मराठी' हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतोय. हा कार्यक्रम सुरु होऊन काही आठवडेच झाले असताना प्रेक्षकांनी अल्पावधीतच या कार्यक्रमाला पसंती दिलीय. प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय-अतुल हे या कार्यक्रमाचे परीक्षक असल्याने कार्यक्रमाची रंगत वा.ढलीय सर्वोत्तम 14 स्पर्धकांमधून महाराष्ट्राला 'इंडियन आयडल मराठी'चा पहिला विजेता/विजेती मिळणार आहे.
यातच ग्रँड प्रिमिअरचा आठवडा दणक्यात झाल्यावर या आठवड्यात स्पर्धकांना आशीर्वाद देण्यासाठी, स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचं कौतुक करण्यासाठी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल खास पाहुण्या म्हणून आल्या होत्या. यावेळी त्यांना घरी परत आल्यासारखं वाटलं असं त्या म्हणाल्या. हा भाग लवकरच सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे.
अनुराधा पौडवाल यांचा वरदहस्त स्पर्धेच्या वाटचालीच्या सुरुवातीला लाभणं ही स्पर्धकांसाठी भाग्याची गोष्ट ठरली आहे. अशा लोकप्रिय गायिका अनुराधा पौडवाल यांच्या येण्यानं 'इंडियन आयडल मराठी' ह्या मंचाच्या माध्यमातून तमाम रसिकांना सुरांची पर्वणी मिळणार आहे.