By  
on  

'तू तेव्हा तशी' मालिकेतून स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर झळकणार एकत्र

एक वेगळी प्रेमकथा घेऊन नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. 'तू तेव्हा तशी' असं या मालिकेचं शीर्षक असून नुकताच या मालिकेचा टीझर प्रदर्शित झालाय. हा टीझर सोशल मिडीयावर लक्षवेधी ठरतोय. या मालिकेतून अभिनेता स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री शिल्पा तुळसकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेनंतर स्वप्नील जोशी पुन्हा एकदा तब्बल 10 वर्षांनी झी मराठी वाहिनीवर झळकणार आहे. या मालिकेत स्वप्निल जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर  शिल्पा तुळसकर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत दिसणार आहेत.  या मालिकेच्या निमित्ताने स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसरकर ही जोडी पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर एकत्र झळकणार आहे. 

 

या नवीन मालिकेविषयी स्वप्नील सांगतो की, "चाळीशी पार केलेल्या सौरभ – अनामिकाची फ्रेश आणि युथफूल प्रेमकहाणी म्हणजेच “तू तेव्हा तशी”. प्रेम करायचं राहून गेलं असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला पुन्हा प्रेमात पाडणारी तर प्रेमात असणाऱ्यांच्या नात्यात आणखी गोडवा वाढवणारी, अशी हि मालिका आहे. यावर्षी मी मालिका करणार असं मी ठरवलं होतं. मालिकांनी आणि टीव्ही माध्यमाच्या रसिक प्रेक्षकांनी आजवर मला भरभरून प्रेम दिलं आहे. त्यांच्यासमोर पुन्हा एकदा येताना मी उत्सुक आहे."

सध्या स्वप्नील हा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात परिक्षक म्हणून काम करतोय. तर याआधी स्वप्नीलने 'जिवलगा' या मालिकेतून टेलिव्हिजनवर पुनरागमन केलं होतं. पुन्हा एकदा स्वप्नील मालिका विश्वात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. 

तर या नव्या मालिकेविषयी शिल्पा म्हणाली की, "“तू तेव्हा तशी” ही गोष्ट आहे प्रेम व्यक्त करण्याचं राहून गेलेल्या सौरभ आणि अनामिकाची. सौरभला त्याचं प्रेम मिळणार की शेवटपर्यंत “प्रेम करायचं राहून गेलं” हीच भावना सौरभसोबत राहणार. या प्रश्नच उत्तर प्रेक्षकांना लवकरच या मालिकेतून मिळेल."

Author

Recommended

PeepingMoon Exclusive