सोनी मराठीवर सुरू असलेल्या ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेत गेले अनेक दिवस बरेच ट्विस्ट अनुभवायला मिळत आहेत. शेतकरी कुटुंबातल्या चार तरुण मुलांची लग्नं जुळवण्याभोवती रचलेलं कथानक आणि रुक्मिणीबाईंनी आपल्या मुलांच्या लग्नाचा उचललेला विडा याभोवती गेले कित्येक दिवस मालिका फिरत होती. अखेर या चौघांच्या लग्नाची गोड बातमी घेऊन रुक्मिणीबाई आपल्या भेटीला येत आहेत. काटे कुटुंबातल्या चारही मुलींची लग्न भालेराव कुटुंबातल्या चार मुलांशी होणार आहेत. विशेष म्हणजे ही लग्नं एकाच मांडवात होणार आहेत. आजवर मालिका विश्वात एखाद्या लग्नाचा घाट घातलेला आपण पाहिला असेल मात्र एकाच मांडवात चार लग्नं होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सोनी मराठीवरल्या मालिकेत पहिल्यांदाच चार भावांची लग्नं एकाच मांडवात लागणार आहेत.
‘आता तरी ठरलं पाहिजे, घर सुनांनी भरलं पाहिजे’ ही एकच इच्छा असणाऱ्या रुक्मिणीबाईंचा आपल्या उपवर मुलांसाठी वधू शोधण्यासाठीचा संघर्ष सुरू झाला. उदरनिर्वाहासाठी शेती व्यवसायाची निवड करणाऱ्या प्रत्येक मुलाची ही कथा आहे. आपल्या शेतात धान्य पिकवून मानवजातीचं पोट भरणारा बळीराजा स्वतःच्या गरजा मात्र भागवू शकत नाही. इतरांप्रमाणे आपलंही लग्न व्हावं ही त्याची साधी अपेक्षा पूर्ण होत नाही. भालेराव कुटुंबही त्यांपैकीच एक. हल्ली मुलींना नोकरी करणारा, महिनाअखेरीस बऱ्यापैकी मिळकत असणारा मुलगा नवरा म्हणून हवा असतो. अशाच तरुणांचं प्रतिनिधित्व रुक्मिणीबाईंच्या थोरल्या मुलानं, प्रभाकरनं केलं आहे. शेती व्यवसाय करून पोट भरणऱ्या तरुणांची ही व्यथा ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या मालिकेतून पाहायला मिळत आहे. आपल्या मुलांच्या लग्नासाठी त्यांचा आईनं विवाहसंस्थांचे उंबरे झिजवले. उपवास, पूजा-अर्चा असे सगळे सोपस्कार केले; तरी या माउलीच्या मुलांची लग्न जुळत नव्हती. शेतकरी असणाऱ्या प्रभाकरलाही केवळ शेती व्यवसाय करणार असल्यामुळे कित्येकदा नकाराला सामोरं जावं लागलं. अखेर सगळे अडथळे पार करत भालेराव-काटे कुटुंबाची भेट झाली आणि मालिकेला नवं वळण मिळालं.
भेटी झाल्या, मनं जुळली आणि हो-नाही म्हणता-म्हणता या दोन कुटुंबांची सोयरीक जुळली. सून घरात आणण्याची रुक्मिणीबाईंची इच्छा आता पूर्ण होत आहे. एक नाही दोन नाही तर चक्क चार-चार सुना रुक्मिणीबाईंच्या घराचं माप ओलांडणार आहेत. ही लग्नं जुळण्याच्या प्रवासात कैक अडथळ्यांचे डोंगर भालेराव आणि काटे कुटुंबीयांनी पार केले आहेत. आता जुळलेली ही लग्नं सुखरूप पार पडतील की एखादं नवं विघ्न या मंडळींसमोर उभं ठाकेल, हे काही सांगता येत नाही. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ मालिकेतल्या या लग्नसोहळ्यात भालेरावांच्या चारही मुलांची लग्नं एकाच मांडवात होणार आहेत. गंमत म्हणजे या चौघांसमोर एकच अंतरपाट धरला जाणार आहे. लग्न असो वा इतर पूजा, काही जुन्या परंपरांमध्ये बदल घडवण्याची गरज आहे; याचं भान ठेवत आपणच पिकवलेलं धान्य अक्षतांच्या नावाखाली वाया जाऊ नये, म्हणून शेतकरी असणाऱ्या प्रभाकरनं अक्षता म्हणून तांदूळ न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या सकारात्मक बदलाला इतरांचा पाठिंबाही लाभला आहे. बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बोहल्यावर चढायला सज्ज झालेले नवरदेव घोड्यावरून नाही तर ट्रॅक्टरवरून येणार आहेत. तर मुलींचा घरात होणारा मेहंदी समारंभ तर दोन्ही लग्नघरात होणारा हळदी समारंभ या विवाहसप्ताहात पाहायला मिळणार आहेत. ट्रॅक्टरवरून येणाऱ्या या वरातीत तुम्हीही सहभागी व्हा आणि नक्की पाहा विवाहसोहळा ‘नवरी मिळे नवऱ्याला’ ! विवाहसप्ताह १६ डिसेंबरपासून रात्री ८ वाजता, फक्त सोनी मराठीवर!!
शरयूने मांडलेला प्रस्ताव प्रशांत मान्य करणार का?
बघायला विसरू नका- नवरी मिळे नवऱ्याला!
सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता,
फक्त सोनी मराठीवर.#नवरीमिळेनवऱ्याला । #NavriMileNavryala#सोनीमराठी | #SonyMarathi#विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati pic.twitter.com/oXp9W6rw3t— Sony मराठी (@sonymarathitv) December 12, 2019