‘विश्वरुप 2’ हा सिनेमा एकाचवेळी तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होत आहे. बॉलिवूडकर कमल हसनसह बातचित करण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. पाच वर्षापूर्वी ‘विश्वरुपच्या’वेळेस कमल हसन आणि प्रसिध्दी माध्यमांची भेट झाली होती. आता सिक्वेलनिमित्ताने ही भेट पुन्हा होते आहे. अॅक्शनने भरपूर असलेल्या ‘विश्वरुप – 2’साठी लेखन, दिग्दर्शन, निर्मिती आणि मुख्य भूमिका अशा सर्वच व्यक्तिरेखा कमल हसन पार पाडतोय. विश्वरुप 2च्या विशेष निमित्ताने सुपरस्टार कमल हसनने पिपिंगमून डॉट कॉमसोबत खास गप्पा मारल्या.
प्रश्न: अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ आणि जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते’ या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणा-या सिनेमांआधी पाच दिवस तुमचा सिनेमा येतोय. तुम्हाला असं वाटतं नाही का तुम्ही एखादा दुसरा दिवस निवडायला हवा होता?
कमल हसन: कुठला चांगला दिवस असतो, तुम्हीच सांगा. 1981 मध्ये माझा हिंदी पदार्पणातील एक ‘दुजे के लिए’ हा सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉलिवूडमध्ये बरीच चर्चा रंगली पावसाळ्यात हा सिनेमा प्रदर्शित करायला नको होता. चुकीची वेळ निवडली आहे. नफा कसा होणार. नवीन सिनेमासाठी योग्य वेळ निवडायला हवी होती. दिग्दर्शक के. बालचंद्रा आणि निर्माते एल.व्ही. प्रसाद त्यावेळी म्हणाले होते, “काही हरकत नाही. पाहूया काय होतंय” आणि लोक पावसाच्या पुरातून हा सिनेमा पाहण्यासाठी आले होते. आमच्या ध्यानीमनीसुध्दा हे कधी आलं नव्हतं. त्यामुळे सिनेमासाठी खास दिवस निवडणं मला अजिबात पटत नाही.
प्रश्न: यावरुनच तुम्हाला ‘विश्वरुप 2’ साठी बॉक्स ऑफिसची भीती वाटत नाही, असंच दिसतंय?
कमल हसन: अजिबातच नाही. कसलीच भीती नाही. मला ‘विश्वरुप 2’बाबत खुपच आत्मविश्वास आहे. हा सिनेमा खुपच वेगळा असून मला त्याचा अभिमान आहे. जेव्हापासून मी हा सिनेमा पूर्ण केला तेव्हापासून मी फक्त या सिनेमाचा एक प्रेक्षक आहे. मी सिनेमांचा एक सच्चा चाहता आहे. मी त्यातून पैसेसुध्दा कमवतो. ते माझ्यासाठी एकप्रकारच्या बोनससारखेच आहेत. जर पैसे मी यात गमावले तरीसुध्दा मला काही वाटत नाही. म्हणूनच लोकांना कधी कधी वाटतं,मी खुप वाईट बिझनेसमन आहे, पण तसं नाही. माझी कंपनी ‘राज कमल फिल्म इंटरनॅशनल’ अजुनही सुरळीत सुरू असून 30 वे वर्ष साजरे करत आहे.
प्रश्न: विश्वरुपम 2 ची कथा कशावर बेतली आहे?
कमल हसन: प्रत्येक कथेवर आज सिनेमे तयार होत आहेत. ‘विश्वरुप 2’ हा राजकारण आणि हेरगिरीवर आधारित थ्रीलर सिनेमा आहे. ही हटके कथा सिनेमातून प्रेक्षकांपर्यत नक्कीच पोहचायला हवी.
प्रश्न: 2013 रोजी विश्वरुपमध्ये तुम्ही अनेक प्रश्न अनुत्तरीत ठेवले होते, पण ‘विश्वरुप 2’ मध्ये याची उत्तरं मिळतील का?
कमल हसन: पहिला भाग हा जिज्ञासा निर्माण करणारा होता. दिग्दर्शक म्हणून काही भाग मला तसाच जिज्ञासा निर्माण करणारा ठेवणं आवश्यक वाटलं. सिनेमे म्हटलं तर मसाला सिनेमेच आवडीने पाहिले जातात, पण मसाला आरोग्यासाठी अपायकारक असतो. म्हणून फक्त योग्य आहे, तेच प्रेक्षकांपर्यंत पोहचायला हवं.
प्रश्न: ‘विश्वरुपम’ला चांगला प्रतिसाद मिळाला. एल.के.अडवाणी यांनासुध्दा हा सिनेमा आवडला. ‘विश्वरुपम 2’कडून तुम्हाला किती कमाईची अपेक्षा आहे?
कमल हसन: अडवाणीची नेहमीच सिनेमाला प्रोत्साहन देतात. ते आधी पत्रकारच होते. ‘विश्वरुप 2’ हा पहिल्या भागापेक्षा अधिक किंवा जास्त नाही. हा सिनेमा कोणत्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर मागे टाकेल हे मला माहित नाही, पण इतकं माहिती आहे की हा एक स्वतंत्र सिनेमा आहे. हा खुपच उत्तम विषयावर आधारित सिनेमा असून तुम्हा सर्वांना तो नक्कीच आवडेल.
प्रश्न: अभिनय आणि दिग्दर्शन हे एकत्र तुम्ही कसं जमवून आणलंत?
कमल हसन: सिनेमांचे सेट म्हणजे फक्त गोंधळ आणि गडबड. पण माझ्या सेटवर मी शांतता ठेवण्याला आधी प्राधान्य देतो. मला शांतता राखायला फार आवडतं. त्यामुळे अभिनय आणि इतर सर्वच तांत्रिक बाबींमध्ये एकाग्रता आणायला मदत होते. मी सेटवरील आणि सीन्समधील प्रत्येक गोष्ट शांतपणे न्याहळतो. मी कधीच अॅक्शन म्हणत नाही. फक्त कट म्हणतो. कारण तेच जास्त महत्तवाचं आहे. सिनेमातील सीन्स जेव्हा पाहत असतो, तेव्हा मी दिग्दर्शक असतो, माझी मतं मांडतो. पण जेव्हा माझ्यावर कॅमेरा असतो तेव्हा मी फक्त अभिनेता असतो.
प्रश्न: जेव्हा बॉलिवूड कलाकारांना तुम्ही निवडता तेव्हा फक्त तुम्ही अभिनेत्यांनाच प्राधान्य देता, स्टार्सला तुम्ही पसंती देत नाही, असं का?
कमल हसन: मी जेव्हा अभिनेता राहुल बोससह संवांद साधत होतो, तेव्हा त्याला या भूमिकेचे फार आकर्षण वाटले. ओमर कुरेशी ही व्यक्तिरेखा त्याला फार भावली. त्याच्यामते तो कथेचा नायक आहे. जयदीप अहलावत, शेखर कपूर आणि अनंत महादेवन यांनी उत्तम व्यक्तिरेखा ‘विश्वरुप 2’ मध्ये साकारल्या आहेत. हे ते लोकं आहेत, ज्यांना माहितीय आपण आयुष्यात काय करायचं आहे. या सिनेमातील स्त्री कलाकरांनीसुध्दा खुप उत्तम काम केलं आहे. हे सर्वचजण मेहनती आहेत.
प्रश्न: तुम्ही आता राजकारणात प्रवेश केला आहे, ‘विश्वरुप 2’ हा तुमचा शेवटचा सिनेमा आहे का?
कमल हसन: मी शेवटचा नाही म्हणणार. अजून तरी शेवटचा सिनेमा आहे, हे स्पष्ट सांगता येणार नाही .