By  
on  

बिग बॉस मराठी 3 : उत्कर्षचा भाऊ आदर्श महेश मांजरेकरांच्या चावडीवर नाराज, म्हटला "बिग बॉस मराठीची चावडीच डबल ढोलकी"

बिग बॉस मराठी 3 च्या चावडीवर होस्ट महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेतात शिवाय त्यांच्या चूकाही अधोरेखीत करतात. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सिझनला दोनच आठवडे झाले असतानाच या कार्यक्रमाची चर्चा सुरु झालीय. शिवाय चावडीही चर्चेत आलीय. चावडीवर महेश मांजरेकरांनी अनेक स्पर्धकांची शाळा घेतलीय. यात उत्कर्ष शिंदेचाही सहभाग आहे. उत्कर्ष हा पहिल्या आठवड्यात कॅप्टन बनल्यानंतर तो हल्लाबोल या टास्कसाठी संचालक देखील होता. मात्र तो पार्शियल संचालक असल्याचं महेश मांजरेकर म्हटले शिवाय त्याला मागील चावडीवर डबल ढोलकीही म्हणण्यात आलं. 

चावडीवर झालेल्या या प्रकारामुळे उत्कर्षचा भाऊ गायक आदर्श शिंदेची संतापजनक प्रतिक्रिया सोशल मिडीयावर पाहायला मिळतेय. यात त्याने बिग बॉसची चावडीच डबल ढोलकी असल्याचं म्हटलय. सोशल मिडीयावर भावाच्या समर्थनार्थ आदर्श पुढे आलेला दिसतोय. 

या पोस्टमध्ये तो लिहीतो की, "मी आज माझी आणि माझ्या वर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांची मतं माझ्या चावडीत मांडणार आहे. चला सरळ मुद्द्यावर बोलेन. सुरुवातीला उत्कर्ष शिंदे याचे विचार विशाल या स्पर्धकासोबत पटत नव्हते. तरीही त्याने विशालचा वापर कॅप्टन्सी टास्क साठी केला, तर याचा राग चावडीला आला आणि उत्कर्ष डबल गेम खेळतोय म्हणजेच डबल ढोलकी आहे असा अर्थ काढण्यात आला. मित्रांनो हा खेळ सुरुवातीला एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचाच खेळ आहे कारण टास्क तसेच आहेत जे ग्रुपने खेळावे लागतात. विशालने कॅप्टन्सी टास्कमध्ये उत्कर्ष यांना मदत केली म्हणून उत्कर्षनीही परतफेड म्हणून विशालला नॉमिनेशन प्रक्रियेत त्याच्या नावाची पाटी न तोडता म्हणजेच नॉमिनेट न करता सेफ ही केलं आणि ते विशालच्या नंतर लक्षातही आलं. पण चावडीला हा फेयर गेम दिसला नाही ? आणि काही प्रेक्षांना ही कळावं म्हणून सांगतोय की बिग बॉसच्या घरात मला चावडी पण डबल ढोलकी दिसते. कारण आता खेळच डबल ढोलकी झालाय."

पुढे आदर्श लिहीतो की, "खेळ स्ट्रॅटेजीचा आहे की रडायचा. आणि गिव्ह अप करून सिम्पथी मिळवायचा ? कारण रडणाऱ्यांनाच प्रेम मिळतय आणि खेळणारे वेडे ठरतायत का ? घरात प्रत्येकाला वाटत असंत की ते फेयर खेळतायत. सिम्पथी गोळा करायला आलात की खेळायला ? हे का निदर्शनास आणून दिलं नाही ? इथे डबल ढोलकी चावडी दिसते."

याशिवाय बरीच उदाहरणं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आली आहेत. एकूणच आदर्श शिंदे हा चावडीवर नाराज दिसतोय. महेश मांजरेकर यांनी चावडीवर उत्कर्षची घेतलेली शाळा पाहून आदर्शने ही संतापजनक प्रतिक्रिया सोशल मिडीयावर व्यक्त केली आहे.

 

Author

Recommended

PeepingMoon Exclusive