बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सिझनचा खेळ आता चांगला रंगात आला आहे. घरातील सदस्यांमध्ये होणारे वाद - विवाद, भांडण, मैत्री, प्रेम या सगळ्या गोष्टी आता चर्चेत येऊ लागल्यात. नुकतीच विकएन्डची चावडी पार पडलीय. ज्यात पहिल्यांदाच एलिमिनेशन करण्यात आलं. यावेळी अक्षय वाघमारेची बिग बॉस मराठीच्या घरातून एक्झिट झाली. एकीकडे अक्षय घरातून निघाला तर दुसरीकडे एक वाईल्ड कार्ड सदस्य आज घरात एन्ट्री करताना दिसणारेय.
विकएन्ड चावडीला एका सदस्याची खास एन्ट्री मंचावर पाहायला मिळाली. हा दुसरा तिसरा कुणी नसून हिंदी आणि मालिका विश्वातील प्रसिद्ध चेहरा म्हणजेच अभिनेता आदिश वैद्य आहे. आदिशने धमाल परफॉर्मन्स करत मंचावर एन्ट्री केली. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी आदिशचं स्वागत केलं. यावेळी महेश मांजरेकरांनी आदिशला काही प्रश्ने विचारली.
आदिशने घरातील सदस्यांमध्ये त्याला कोण आवडते, कोणाशी मैत्री होईल ? याविषयी सांगितलं. तो म्हणतो की, “खूप उत्सुक आहे घरामध्ये जायला. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येकजण आपल्या पध्दतीने खेळायचा प्रयत्न करतो आहे. माझा आवडता सदस्य विकास पाटील आहे. काही बाबतीत मी त्याला रिलेट करू शकतो. जय, विशाल (टास्कच्या बाबतीत) आणि मीनल हे तीन सदस्य स्ट्रॉंग प्रतिस्पर्धी आहेत असं मला वाटत. वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे घरामध्ये गेलेले स्पर्धक कधी जिंकले नाही पण मी घरामध्ये लवकर जात आहे तर ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे विजेता म्हणूनच मला बाहेर यायला नक्की आवडेल.”
तेव्हा आदिशच्या एन्ट्रीनंतर इतर स्पर्धकांच्या काय प्रतिक्रिया असतील, आदिश कोणत्या ग्रुपचा भाग होईल ? कुणासोबत त्याची मैत्री होईल ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.