बिग बाॅस मराठी 2 च्या घरात बाॅलिवुडचा भाईजान अर्थात सुपरस्टार सलमान खान विकएंडच्या डावात सर्व स्पर्धकांना भेटायला आला होता. सलमान खानची एन्ट्री झाल्यामुळे सर्व स्पर्धक खुश झाले होते. तसेच वीकएंडच्या डावात महेश मांजरेकरांसह सलमान खानने सर्व स्पर्धकांची शाळा घेतली.
यावेळी महेश मांजरेकरांनी सलमान खानला अनेक प्रश्न विचारून त्याच्याकडून धमाल किस्से जाणून घेतले. ''कधी वडिलांचे पैसे उडवलेस का?''असा एक मिश्किल प्रश्न महेश मांजरेकरांनी सलमान खानला विचारला. तेव्हा सलमान खान म्हणाला,''पैसे उडवले नाहीत पण पैसे जाळले आहेत.''
सलमान पुढे म्हणाला,''होळीचा दिवस होता. एका टोपल्यात पेपर घेतला आणि पेपर लगेच जळाला. त्यानंतर मला जाळण्यासाठी अजून काहीतरी हवं होतं. तर बाजूला एक वस्तू होती ती उघडली आणि त्याच्यातल्या नोटांची सुरळी करून त्या आगीत टाकल्या. आता त्या नोटा होत्या हे त्यावेळेस मला माहित नव्हतं. बाबांनी पाहिलं. तर मी त्यांचा संपूर्ण ७५० रुपयांचा पगार जाळला होता. बाबांचा आदल्या दिवशीच पगार झाला होता. नंतर बाबांनी बँकेत जाऊन नोटा बदलायचा प्रयत्न केला. परंतु नोटा जळालेल्या असल्याने बँकेने बदलून दिल्या नाहीत. तर पैसे जाळण्याची सवय मला लहानपणापासूनच होती.'' असं म्हणत सलमानने हा धमाल किस्सा सर्वांसोबत मोकळेपणाने शेयर केला.
सलमानने हा किस्सा सांगताच महेश मांजरेकरांसह उपस्थित प्रेक्षकांमध्ये खसखस पिकली. वीकएंडच्या डावात सलमान खानने हजेरी लावल्याने काल घरातील सर्व सदस्य खुश झाले होते.