केलेल्या कामाबद्दल पैसे मिळणं ही बाब विशेष नाही. सामान्य व्यक्तीसाठी तर नाहीच नाही. पण कलाकारांच्या मानधनाची बातमी येते तेव्हा मात्र सगळ्यांचंच लक्ष वळतं. एरवी हिंदी सिनेमातील कलाकारांच्या मानधनातील आकड्यांची चर्चा सर्वतोपरी असते. कोणी किती कमावले? कोणी किती मागितले? कोणी पैशाच्या कारणामुळे सिनेमा सोडला? या चर्चा बॉलिवूडमध्ये होत असतात. तुलनेने अशा बातम्या मराठी सिनेसृष्टीत कमी असायचं. पण आता दिवस बदलले आहेत.
मराठी सिनेमांचा परिघ विस्तारला आहे. त्यामुळे कलाकारांच्या मानधनातही वाढ झाली आहे. पण अजूनही मराठी नायकाला मिळणारं मानधन आणि नायिकेला मिळणारं मानधन यात तफावत आहेच. पण आता या सगळ्यांवर कडी केली आहे ती रिंकूने. इयत्ता आठवीत असताना ‘सैराट’ची नायिका बनलेली रिंकूने प्रत्येकालाच तिची दखल घेण्यास भाग पडलं. नुकतीच बारावी झालेल्या रिंकूने तिच्यासाठी सैराटचं यश केवळ अपघात नव्हता, तर अभिनेत्री होण्यास ती पुर्णपणे सक्षम असल्याचं दाखवून दिलं आहे.
नुकताच तिचा ‘कागर’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमातील तिच्या दमदार भूमिकेने वाहवा मिळवली. आता तिचा ‘मेक अप’ हा सिनेमा येऊ घातला आहे. 'एबीपी माझा'च्या वृत्तानुसार, या सिनेमासाठी रिंकूने तब्बल २७ लाखांचं घसघशीत मानधन घेतल्याचं समोर आलं आहे. रिंकूला मिळालेलं मानधन आतापर्यंत कोणत्याही मराठी अभिनेत्रीला मिळालेल्या मानधनाच्या जवळपासही नाहीये.
सई, अमृता, सोनाली, तेजस्विनी अशा प्रस्थापित अभिनेत्रींचं मानधन पाहता रिंकूने त्यांना बरच मागं टाकलं आहे. त्यामुळे अल्पावधीतच रिंकू मराठी सिनेमातील प्रस्थापित नाव होऊ घातलं आहे यात शंका नाही.