आजच्या 'फादर्स डे' निमित्त अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री मयुरी देशमुख यांनी त्यांच्या वडलांविषयीच्या भावना मोकळेपणाने शेयर केल्या.
बाबा मला मिळालेली अमूल्य देण आहे - ललित प्रभाकर
माझ्या आयुष्यात बाबांचं स्थान खूप महत्वाचं आहे. बाबा माझे आदर्श आहेत. एका छोट्या खेडेगावातून शिक्षण घेऊन बाबा रिकाम्या खिशाने मुंबईत काम करण्यासाठी आले होते. अनेक रात्री त्यांनी रेल्वे स्टेशनवर जागून काढल्या. त्यानंतर त्यांना नोकरी मिळाली आयुष्यात स्थिरता यायला लागली. त्यावेळी त्यांनाही माझ्या आईला शिकवून नोकरीस लावले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत माझे बाबा पुढे आले आहे. त्यामुळे त्यांना सर्वच गोष्टींची जाणीव आहे. ते नेहमीच मला कधीही यशाने हुरळून न जाता पाय जमिनीवर राहू देत जा असे सांगत असतात. मुख्य म्हणजे हे तत्व ते स्वतः आचरणात आणतात. बाबा मला देवाकडून मिळालेली एक अमूल्य देण आहे.
माझ्या बाबांनी माझ्या सर्व गरजा अगदी मी न सांगता पूर्ण केल्या आहेत. काहीवेळा मी ओरडा पण खाल्ला आहे. पण त्यामागे त्यांचा हेतू नेहमी योग्य असायचा. बाबांनी मला प्रत्येक गोष्टीत पाठिंबा दिला. पण अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या माझ्या निर्णयाला त्यांचा पाहिजे तसा पाठिंबा नव्हता. त्याचे कारणही तसेच होते. हे क्षेत्र खूप अस्थिर, अनिश्चित आहे. यात माझा टिकाव कसा लागेल याची काळजी त्यांना नेहमी असायची. आता मात्र माझा काम पाहून त्यांना माझा अभिमान वाटतो. मला घडवण्यात माझ्या बाबांचा अगदी सिंहाचा वाटा आहे. मी त्यांचे कष्ट त्यांचे काम खूप जवळून पहिले आहे. अगदी कठीण काळातही बाबांनी हार न मानता मेहनत केली. एवढा सर्व काम करत असतांना सुद्धा त्यांच्या सोबत एक गोष्ट नेहमीच राहिली आणि म्हणजे त्यांचे हास्य. बाबांवर कितीही अवघड वेळ आली असली तरी ते नेहमी हसत असतात. हसून आलेल्या संकटाचा सामना ते करतात. त्यामुळे त्यांना कधीही 'स्माईल प्लीज' असे सांगावे लागले नाही. याउलट तेच सर्वाना 'स्माईल प्लीज' असा गोड सल्ला देत असतात. बाबांनी आता छान आराम करून त्यांचे सर्व छंद पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे अशी आमची इच्छा आहे. सर्वाना 'फादर्स डे' च्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्यासाठी माझे बाबा जादूगारच - मयुरी देशमुख
"बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन,
स्वतः च्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून मुलांसाठी झ़टणार अंतःकरण..."
या चारोळी मध्ये सांगितल्या प्रमाणेच माझे बाबा आहे. ह्या ओळी त्यांना खऱ्या अर्थाने माझ्या किंबहुना या जगातील सर्वच वडिलांना अगदी साजेशा आहेत. माझ्यासाठी माझे बाबा म्हणजे एक जादूगारच आहे. लहानपणा पासूनच त्यांनी आम्हाला मोठे केले, आमच्यावर जे संस्कार केले, आम्हाला काय हवे काय नको ते सर्व त्यांनी पाहिले. नुसते लाड नाही केले तर, चांगल्या वाईट सर्वच गोष्टी त्यांनी अगदी योग्य पद्धतीने आम्हाला समजून सांगितल्या. माझे बाबा आमच्यासाठी एक आदर्श बाबा आहे. आज माझे जेव्हा जेव्हा कौतुक होते तेव्हा मी त्याचे श्रेय माझ्या वडिलांनाच देते. बाबांमुळे मला खूप चांगल्या सवयी लागल्या. त्यातलीच एक सवय म्हणजे माणसं जमा करण्याची. या सवयीमुळे मी लोकांच्या बाबतीत खूप श्रीमंत आहे. इतकी माणसं मी जमवली आहे. त्यासाठी त्यांचे खूप आभार. माझ्या लग्नाच्या वेळेस घरात खूप कल्ला असायचा यातही माझे बाबा अगदी काळजीपूर्वक आणि नीटनेटक्या पद्धतीने सर्व गोष्टी हाताळत होते. बाबांच्या अशा छोट्या, मोठ्या अगणित आठवणी माझ्या स्मरणात आहे. माझे बाबा फक्त मी किंवा माझ्या परिवारापुरतेच मर्यादित नाहीये. त्यांचे मित्र, आमचे सर्व नातेवाईक, शेजारचे सर्वांसाठीच बाबा नेहमी मदतीसाठी तयार असतात. बाबांनी आमच्यासाठी अविरत कष्ट केले पण,आता वेळ बदलली आहे. त्यांनी त्यांचे सर्व कर्तव्य अगदी योग्य रितीने पार पाडले आहे. म्हणूनच बाबांनी आता खूप आराम करावा, त्याच्या ज्या गोष्टी करायच्या राहून गेल्या आहेत त्यांनी त्या सर्व गोष्टी आता कराव्या आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. अशीच आमची इच्छा आहे. सगळ्यांना 'फादर्स डे' च्या हार्दिक शुभेच्छा.