ट्रोलींगचा सामना करणं कलाकारांसाठी नवीन नाही. खुपवेळेस या ना त्या कारणामुळे अनेकदा कलाकारांना ट्रोलिंगला सामोरे जावे लागते. तसेच सिनेमा न आवडल्याने कलाकारांचे चाहते सोशलमीडियावर त्या कलाकारावर टीकेचा भडीमार करताना आपला राग व्यक्त करतात.
असाच एक अनुभव रितेश देशमुखला आला. रितेश देशमुखच्या एका फॅनला रितेशचा 'बँगिस्तान' हा सिनेमा आवडला नाही. त्यामुळे या फॅनने रितेशच्या ट्विटरवर पैसे परत देण्याची मागणी केली. एरवी कोणी कलाकार फॅनवर रागावला असता. परंतु रितेशने हटके अंदाजात फॅनच्या कमेंटला रिप्लाय दिला.
रितेशने चलनातून बाद केलेल्या १००० रुपयाच्या नोटेचा फोटो फॅनला पाठवला. ''हे घे तिकिटाचे पैसे, तसेच या पैशात समोसा वैगरे खर्च सुद्धा भागवून घे'' असा हटके रिप्लाय रितेशने त्या फॅनला दिला. रितेशने दिलेल्या या प्रत्युत्तरामुळे रितेशमधल्या खिलाडुवृत्तीचा आणि विनोदीशैलीचा प्रत्यय त्याच्या चाहत्यांना दिसून आला.
Here you go! समोसे के भी adjust कर लेना (currency used in 2015) https://t.co/dfTc2nYeGz pic.twitter.com/wSHPYFhUe0
— Riteish Deshmukh (@Riteishd) July 12, 2019
'बँगिस्तान' हा सिनेमा २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यामुळे त्यावर्षी भारतात जी १००० ची नोट अस्तित्वात होती त्याचा फोटो रितेशने पाठवल्यावर नेटकऱ्यांनी रितेशच्या हजरजबाबीपणाचं कौतुक केलं. 'बँगिस्तान' या सिनेमात रितेशसोबतच पुल्कीत सम्राट, जॅकलिन फर्नांडिस, आर्या बब्बर यांच्या मुख्य भूमिका होत्या. या सिनेमाचे निर्माते रितेश सिडवानी आणि फरहान अख्तर होते तर करण अंशूमन यांनी दिग्दर्शन केले होते.