सांगली-कोल्हापूरमध्ये पुराने थैमान घातले. तेथील जनजीवन विस्कळीत झाले. आता हळूहळू तेथील स्थिती पूर्वपदावर येत आहे. या भागासाठी सामान्य नागरिकांपासून ते अनेक सेलिब्रिटींपर्यंत मदतीचा ओघ आला आहे. यातच अभिनेत्री आणि नृत्यांगना दिपाली सय्यदने सांगलीमधील १००० मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच तिच्या सय्यद फाउंडेशन तर्फे तिने ५ कोटींची मदत जाहीर केली आहे.
या पूरामध्ये अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. त्यासोबतच असे अनेक कुटुंब आहेत जेथे विवाहयोग्य मुली आहेत. मात्र सध्या येथील परिस्थिती पाहता नागरिकांसमोर मुलींच्या लग्नाची आणि शिक्षणाची मोठी समस्या निर्माण झाली आहे.
दिपाली सय्यदने आपल्या फाऊंडेशनतर्फे पूरग्रस्त कुटुंबातील प्रत्येक मुलीच्या नावाने ५० हजार रूपयांची मुदत ठेव पावती करण्यात येणार आहे. ही रक्कम त्या मुलीच्या लग्नासाठी वापरण्यात येणार आहे. यात एकूण ५ कोटी रुपये खर्च करणार असल्याची माहिती दिपाली सय्यद यांनी दिली आहे. अभिनेत्री दिपाली सय्यदने उचलेल्या या पावलामुळे तिचं सर्वच स्तरांवर कौतुक होत आहे.