एका रात्रीत स्टार होणं, काय असतं, ते ‘सैराट’ फेम रिंकू राजगुरूनं चांगलंच अनुभवलं आहे. तिने साकारलेल्या आर्चीनं फक्त तिला स्टारडमचं नाही तर राष्ट्रीय पुरस्कारही मिळवून दिला. शालेय शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीचं रिंकू ‘सैराट’मुळे प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली. तिच्या बिनधास्त आणि बेधडक अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले.
‘सैराट’मधील आर्ची साकारल्यामुळे रिंकू घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या लोकप्रियतेने इतका उच्चांक गाठला की तिची एक झलक पाहाण्यासाठी चाहत्यांची तिच्या घराबाहेर गर्दी जमू लागली. अनेक कार्यक्रम-सोहळ्यांमध्ये तिच्या प्रमुख उपस्थितीची मागणी वाढू लागली. तिचे घराबाहेर पडणे मुश्कील होऊ लागले. शाळेचीही तिच त-हा, जेव्हा सैराट प्रदर्शित झाला तेव्हा रिंकू फक्त नववीत होती. त्यामुळे शाळेतसुध्दा रिंकूला आपल्या प्रसिध्दी वलयामुळे ब-याच अडचणींचा सामना करावा लागला. पण तरीसुध्दा शाळेत उपस्थित न राहूनसुध्दा स्वत: अभ्यास करुन दहावीत उत्तम गुणांसह ती उत्तीर्ण झाली. आता जवळपास ‘सैराट’च्या दोन वर्षांनतर रिंकू पुरागमनासाठी सज्ज झाली आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक विजू माने यांच्या ‘कागर’ या सिनेमाद्वारे रिंकू पुनरागमन करतेय. याबाबतच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत रिंकू सांगते, “सैराटपेक्षा ‘कागर’मधील माझी भूमिका खूप वेगळी आहे. पण या सिनेमातील माझ्या भूमिकेला आर्चीच्या छटा आहेत. मकरंद सरांनी मला या सिनेमाची कथा वाचून दाखवताच क्षणी मला ती आवडली.
रिंकू पुढे सांगते, “ अनेक सिनेमांच्या प्रोजेक्ट्सवर सध्या मी काम करत असून याबाबतची अधिक माहिती लवकरच तुमच्यापर्यंत पोहचवेन. कागर सिनेमाला माझी संमती देण्यापूर्वी याबबात मी नागराज मंजुळे सरांकडून पूर्ण मार्गदर्शन घेतले होते. तसेच या भूमिकेबाबतही आमच्यात बरीच चर्चा झाली होती. मला मार्गदर्शन करण्यात नागराज सर नेहमीच तत्पर असतात. तसंच ‘सैराट’ची आमची संपूर्ण टीम नेहमीच एकमेकांच्या संपर्कात असते.”
‘कागर’ सिनेमामधील रिंकूच्या लूकची यापूर्वी बरीच चर्चा झाली. तिने या सिनेमासाठी आपलं बरंचसं वजन घटवले आहे. याबाबत अनेक चर्चांना उधाण आलं होतं. सर्वांना तिने ‘कागर’ सिनेमासाठी वजन घटवले असं, वाटत असलं तरी या वजनाच्या प्रक्रियेसाठी फार पूर्वीपासूनच मी तयारी सुरू केली होती, असे रिंकू स्पष्ट करते.
रिंकूला नृत्य फार आवडते. लहानपणापासून नृत्य ही रिंकूची आवड आहे. आगामी ‘कागर’मध्ये तिचे नृत्यसुध्दा चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. ‘सैराट’नंतर इतक्या मोठ्या कालावधीने रिंकूच्या आगामी सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.