टीआरपीची स्पर्धा आम्हाला आमच्या ध्येयापासून कधीच वेगळं करू शकत नाही: अजय भाळवणकर

By  
on  

आज बरेच मराठी एंटरटेन्मेन्ट चॅनेल्स प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. गेली अनेक दशकं प्रेक्षकांचं अविरंत मनोरंजन करणारे आणि क्रीडा, सिनेमा, म्युझिक अशा विविध चॅनेल्सच्या माध्यमातून घराघरांत लोकप्रिय असलेले सोनी पिक्चर्स नेटवर्क ‘आपलं मराठी चॅनेल’ म्हणजेच सोनी मराठी घेऊन आले आहे. विणूया अतूट नाती….सोनी मराठी म्हणत या नवीन चॅनेलने मराठी चॅनेल्सच्या स्पर्धेत दमदार पदार्पण करत आपलं स्थान पटकावलं आहे. यानिमित्ताने मराठी पिपींगमून डॉट कॉमवर सोनी मराठीचे सर्वेसर्वा, कार्यकारी उपाध्यक्ष आणि बिझनेस हेड अजय भाळवणकर यांच्यासोबत खास बातचित.

प्रश्न : एक पत्रकार ते आता सोनी मराठीचे सर्वेसर्वा इथपर्यंतच्या तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?

अजय भाळवणकर :  हो नक्कीच. मिडीयामध्ये यायचं हे कॉलेजविश्वापासूनच मनाशी पक्क होतं. लिहीण्याची आवड  उपजतच होती. त्यामुळेच क्रिएटीव्ह क्षेत्रात काम करण्याबाबत प्रचंड उत्सुकता नेहमी असायची. मी जेव्हा पत्रकारिता करत होतो, त्यावेळेस खासगी एंटरटेन्मेन्ट चॅनेल्स फारच कमी होते, त्यामुळे साहजिकच संधीला वाव नव्हता. पण हळूहळू ते चित्र पालटायला सुरुवात झाली आणि खासगी एंटरटेन्मेन्ट चॅनेल्स लॉंच झाल्याने संधी मिळणं थोडंफार सोपं झालं. मी ज्या वर्तमानपत्रासाठी काम करत होतो, ते फक्त एका शहरापुरतं मर्यादित होतं. पण खासगी एंटरटेन्मेन्ट चॅनेल्समुळे घराघरांत पोहचता येतं, लोकांना जाणून घ्यायला मिळतं, हे माझ्या लक्षात आलं. म्हणूनच पुढे मी टीव्हीकडे आकर्षित झालो आणि इथेच रमलो. आधी हिंदी वाहिनीत होतो मग मराठीत मग पुन्हा हिंदी आणि आता पुन्हा मराठी चॅनेल लॉंच केलं, एकूणच भाषेचं मध्यम वेगळं असलं तरी प्लॅटफॉर्म तोच होता. म्हणूनच सोनी मराठीपर्यंतचा माझा प्रवास अगदी सुखकर झाला.

प्रश्न : सोनीने विणूया अतूट नाती म्हणत मराठीत पदार्पण करावं, अशी नेमकी संकल्पना कशी आकाराला आली?

अजय भाळवणकर :  मराठी चॅनेल्स लॉंच करण्याचा मानस सोनी पिक्चर्स नेटवर्क्सचा फार वर्षापासूनचा होता. आम्ही सोनी मराठी सुरू करण्यापूर्वी बरंच सर्वेक्षण केलं. समाजातली सध्याची स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. टीव्हीकडे बघण्याचा जनमानसाचा दृष्टीकोन पडताळला. आजच्या घडीचं मराठी चॅनेल नसल्याचं आम्हाला जाणवलं, जे चॅनेल्स आहेत ते कुठेतरी एकाच चक्रात अडकले आहेत. म्हणूनच सोनी मराठीचा आम्ही निर्णय घेतला. एक नवीन फ्रेश चॅनेल घेऊन येण्यासाठी आम्ही गेली एक दीड-वर्ष यावर काम करतोय. महत्त्वाचं म्हणजे नेहमी वैविध्यपूर्ण कार्यक्रम प्रेक्षकांसमोर मांडणं हा सोनी पिक्चर्स नेटवर्कचा नेहमीच हातखंडा राहिला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असं मराठी चॅनेल आम्ही घेऊन आलो आहोत आणि याची प्रचिती म्हणजे चॅनेल लॉंच झाल्यापासून त्वरितच आली. उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत, की आम्हाला एक नवीन आणि फ्रेश चॅनेल पाहायला मिळतंय. काही तर असेही म्हणतायात की तुमचे नवीन रंग आणि अनोख्या मालिका पाहून असं वाटतंय आमचा टेलिव्हिजन सेट जुना असला तरी तो आता सोनी मराठीमुळे नवीन भासू लागला आहे. फार आनंद होतो, हे ऐकून.

 

प्रश्न : तुम्ही कार्यक्रमांसाठी स्ट्रॅटेजी प्लॅन करताना,नेमकं कोणत्या वर्गाला डोळ्यासमोर ठेवलंय युवा की कौटुंबिक ?

अजय भाळवणकर :  कुटुंबातल्या प्रत्येकासाठी आम्ही मनोरंजन कार्यक्रम घेऊन आलो आहोत. सोनी मराठीवरचे कार्यक्रम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजचण एन्जॉय करु शकतात.‘ह.म.बने -तु.म बने’ ‘हद्यात वाजे समथिंग’, ‘ती फुलराणी’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ असे सर्वच कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. हे कार्यक्रम सर्वांसाठी असल्याने सोनी मराठी कुठेतरी बॅलन्स साधण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रश्न : जसं सोनीचं नाव हिंदीत आग्रहाने घेतलं जातं तसं आज अनेक मराठी एंटटेन्मेन्ट चॅनल्स  अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहे, सोनी या स्पर्धेत आपलं वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी आणि टीआरपीच्या खेळात अव्वल राहण्यासाठी नेमकं काय करणार ?

अजय भाळवणकर :  दोन अडीच दशंकं सोनी पिक्चर्स नेटवर्कने आपले वेगळेपण अबाधित ठेवलं आहे. सोनी मराठीच्या सर्वच कार्यक्रमांमध्ये तुम्हाला ते वैविध्य दिसून येईल. टीआरपीची स्पर्धा ज्यांना करायचीय त्यांना ती करू दे. टीआरपीचा खेळ आम्हाला आमच्या ध्येयापासून कधीच वेगळं करु शकत नाही. आम्हाला लोकांच्या पसंतीस उतरणारा सोनी मराठी हा ब्रॅंड निर्माण करायचाय. लोकांना जर उत्तम मनोरंजनपर कार्यक्रम दिले तर ते नक्की पाहातात, हा गेल्या 25-26 वर्षांतला माझा स्वानुभव आहे.

रटाळ कौटुंबिक डेली सोप ऐवजी मर्यादित भागांच्या मालिकेला सोनी मराठी महत्त्व देणार का ? किंवा रटाळ अशी मोहोर लागू नये म्हणून काही प्रयत्न केले जाणार ?

अजय भाळवणकर :  विविध प्रकारचे कार्यक्रम सोनी मराठीवर प्रसारित होत आहेत. मनोरंजनापासून रिएलिटीपर्यंत सर्वकाही एकाच ठिकाणी प्रेक्षक पाहू शकतात. ‘ह.म.बने -तु.म.बने’ सारखी मालिका प्रत्येक एपिसोडमध्ये एक गोष्ट पूर्ण करते. ‘इयर डाऊन’ मालिका एका उद्योजकाची कहाणी आहे, प्रेम मिळविण्यासाठीची त्याची धडपड आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहे.जेव्हा त्याचं प्रेम  त्याला मिळेल तेव्हा मालिका संपेल. त्यामुळे कथानकानुसार वेळोवेळी निर्णय घेण्यात येतील.

Recommended

Loading...
Share