अभिनेता अक्षय कुमारने PeepingMoon.com च्या कार्यालयाला नुकतीच भेट दिली. 'चुंबक'च्या प्रोमोशनमधून थोडासा वेळ काढत बॉलिवूडच्या खिलाडी कुमारने PeepingMoon च्या मराठी वेबसाईटचे लॉन्च केले आणि सिनेमा या विषयावर दिलखुलास गप्पा मारल्या. मराठी सिनेमांचं आपल्याला नेहमीच अप्रुप वाटतं, हे सिनेमे प्रेक्षकांना नेहमीच आकर्षित करतात, असं तो यावेळी म्हणाला.
मराठी सिनेमांमधील तुम्हाला काय आवडतं हे विचारल्यावर, अक्षय म्हणतो “आज विविध विषयांवर मराठी सिनेमे येत आहेत. त्यांच्यात नेहमीच एक विविधता जाणवते. हिंदी सिनेमात ज्या विषयांवर सिनेमे तयार करण्यात आले नाहीत, त्यावर मराठी सिनेमे बनले आहेत. मराठी सिनेमांचे विषय फार चोखंदळ अससतात. मराठीत नेहमीच बोल्ड विषय हाताळले जातात. हिंदी सिनेमात तेवढं धाडस नाही. मला वाटतं हिंदी सिनेमांनी मराठीचं अनुकरण करायला हवं. मराठीतला’ बालक-पालक’ सिनेमा मी पाहिला सिनेमाद्वारे जबरदस्त संदेश पोहचवण्यात आला आहे. मला तो विषय फार भावला. हा सिनेमा हिंदीत व्हायला हवा, असं मला वाटतं. ”
‘72 मैल –एक प्रवास’ सिनेमानंतर अक्षय ‘चुंबक’सह मराठी प्रेक्षकांसमोर एक हद्यस्पर्शी आणि हटके विषय सादर करत आहे. गीतकार-संगीतकार आणि अभिनेता स्वानंद किरकिरेंची यात प्रमुख भूमिकेत आहे.
एक 15 वर्षीय गरीब मुलगा आणि एक मध्यवयीन गतिमंद गृहस्थ यांच्या जीवनाचा वेध घेणारी हद्यस्पर्शी गोष्ट म्हणजे चुंबक. प्रसन्न ठोंबरे ही व्यक्तिरेखा स्वानंद किरकिरे यांनी साकारली आहे. तर ‘डिस्को’ ही दुसरी महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा संग्राम देसाई या कुमारवयीन युवकाने साकारून सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. संदीप मोदी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.
येत्या 27 जुलैला ‘चुंबक’ महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.