अभिनेता इरफान खानची प्रमुख भूमिका असेलला ‘कारवां’ हा सिनेमा आज प्रदर्शित होत आहे. ‘कारवां’च्या टीमने विविध ठिकाणी आणि विविध प्लॅटफॉर्मवर सिनेमाचे प्रमोशन केले पण दुर्दैवाने इरफानला या टीमपासून अलिप्त रहावे लागले. याचे कारण आपण सर्वच जाणतो इरफान दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्याला ट्यूमर झाला असून तो लंडनमध्ये सध्या उपचार घेत आहे.
एका मुलाखती दरम्यान इरफानने आपल्या आजाराची माहिती दिली. तो म्हणतो, “आतापर्यंत चारवेळा केमोथेरेपी झाली असून आणखी दोन वेळा केमोथेरेपी झाल्य़ावर कॅन्सर पुन्हा स्कॅन करण्यात येईल आणि त्यानंतर समजेल की परिस्थिती कशी आहे. मला हा आजार आहे आणि मला माहित नाही की माझं आयुष्य हे काही महिन्यांचं आहे ,एक वर्षाचं की दोन वर्षाचं आहे. आयुष्याची कुठलीच शाश्वती नाही. कधी कधी असं वाटतं, की डोक्यात एक चिप बसवावी आणि त्यात सेट करुन ठेवावं मला हा आजार आहे आणि काही महिने किंवा वर्षांनी माझं आयुष्य संपणार आहे. किंवा कधी कधी असं वाटतं दुस-या बाजूने पाहावं, याचा कसलाच विचार न करता जसं आयुष्य समोर येईल तसं जगावं.”
इरफान पुढे सांगतो, “मी आता आयुष्याकडे दुस-या बाजूने पाहतोय. कुठलीच गोष्ट आता ठरवून करत नाही. माझे कुठलेच प्लान्स आता नियोजित नाहीत. मनाप्रमाणे जगतो आहे. काही आव्हानं असतात, जी आयुष्यात तुमच्यासमोर अचानक येतात. सध्या ही परिस्थिती माझी सर्वच बाजूने परिक्षा घेत आहे. शारिरिक, भावनिक आणि आध्यात्मिक या सर्वच पातळ्यांवर मी परिक्षा देतो आहे.”
उपचारासाठी लंडनला जाण्यापूर्वी ‘कारवां’ हा इरफानचा शेवटचा सिनेमा. सिनेमाचे प्रोड्यूर रॉनी स्क्रूवाला आणि प्रिती राठी गुप्ता आणि दिग्दर्शक आकर्ष खुराना यांनी लंडनमध्ये इरफानसाठी या सिनेमाचे विशेष स्क्रिनींग ठेवले आहे. तसंच यादरम्यान सिनेमाच्या प्रोमोशनमध्येसुध्दा अभिनेत्री मिथीला पालकर आणि अभिनेता दुलकर सलमान यांनीसुध्दा यावेळी इरफान सरसोबत असते तर खुप मजा आली असती, अशा भावना व्यक्त केल्या.
इरफान खान, मिथीला पालकर आणि दुलकर सलमान यांची प्रमुख भूमिका असलेला ‘कारवां’ आज 3 ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.