........म्हणूनच भाऊ कदम यांना आवडतात वेबसिरीज;लवकरच येणार नवीन विषय घेऊन

By  
on  

अवघ्या महाराष्ट्राला खळखळू हसवणारे विनोदाचे भाऊबली म्हणजेच सर्वांचे लाडके भाऊ कदम. सिनेमा, नाटक, मालिका आणि आता मराठी वेबसिरीजमधून आपल्या विनोदांनी धुमाकूळ घालणा-या भाऊंच्या ‘लिफ्टमॅन’ची बरीच चर्चा रंगली आहे. भाऊंनी हे नवीन माध्यम निवडल्याने प्रेक्षकसुध्दा भलतेच खुश झाले आहेत. म्हणूनच मराठी पिपींगमून डॉट कॉमने याविषयी, विनोदवीर भाऊ कदम यांच्यासोबत खास बातचित केली.

‘लिफ्टमॅन’ या वेबसिरीजमधून म्हणजेच या नवीन माध्यमातून तुम्ही प्रेक्षकांसमोर येत आहात, याबाबत काय सांगाल, हे विचारल्यावर भाऊ म्हणतात, “वेबसिरीज हा प्रेक्षकांपर्यंत पोहचण्याचा सर्वात सोपा आणि थेट मार्ग आहे. फार कमी कालावधीत एखादी संकल्पना उत्तमरितीने इथे प्रभावीपणे मांडता येते. तसंच तुम्ही केव्हाही, कधीही तुमच्या सोयीनुसार त्या पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला कुठल्याही अमूक एखाद्या वेळेची गरज भासत नाही किंवा ते पाहण्यासाठी कुठल्या ठिकाणी जावं लागत नाही. कंटाळवाणा प्रवास करताना वेबसिरीजच्या माध्यमातून मनमुराद आनंद तुम्ही घेऊ शकता. म्हणूनच आज वेबसिरीजचा जमाना आहे आणि म्हणूनच मला हे नवीन माध्यम फार आवडतं.”

‘लिफ्टमॅन’बद्दल अधिक बोलताना भाऊ सांगतात, “पहिल्यांदा जेव्हा ही संकल्पना माझ्यासमोर ठेवण्यात आली तेव्हा म्हटलं, या व्यक्तिरेखेला कसं प्रत्येक भागांत खुलवता येईल. इथे जास्त वाव असेल की नाही, याबाबत जरा शंका होती. पण जसं जसं आम्ही प्रत्यक्ष चित्रिकरणाला सुरूवात केली, तेव्हा समजू लागलं की लिफ्टमॅन या पात्राच्या आयुष्यात दररोज कसे नाना त-हेचे लोक येतात आणि त्याला त्यांच्यासोबत कसा विविध प्रकारे सवांद साधावा लागतो, कसे मजेशीर प्रसंग घडतात व यातून कसा विनोद निर्माण होतो.”

वेबसिरीजच्या या एकूणच अनुभवाविषयी, भाऊ म्हणाले, “मला या ‘लिफ्टमॅन’च्या संपूर्ण टीमसोबत काम करायला भरपूर धम्माल आली. वेबसिरीज या मर्यादित भागांच्या असल्याने यासाठी फार कमी वेळ द्यावा लागतो. यासाठी Zee5चे विशेष आभार मला मानावे लागतील. ‘लिफ्टमॅन’ ही वेबसिरीज मराठीसह एकूण पाच विविध भाषांमध्ये डब झाली आहे. त्यामुळे या वेबसिरीजचा आनंद तिथेसुध्दा आता घेता येईल. तसंच आगामी वेबसिरीजच्या अनेक नवीन विषयांवरसुध्दा आमचं काम सुरू असून लवकरच नवीन वेबसिरीजच्या माध्यमातून मी प्रेक्षकांसमोर येईन. फक्त तुम्हाला जरा वाट पाहावी लागेल. ”

भाऊ तुम्ही प्रेक्षकांना सतत हसवत राहा, तुमच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मराठी पिपींगमून डॉट कॉमकडून खुप खुप शुभेच्छा !

Recommended

Share